Published on
:
03 Feb 2025, 8:07 am
Updated on
:
03 Feb 2025, 8:07 am
पुणतांबा : दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम सध्या रेल्वे विभागाकडून जवळपास पूर्ण झालेले आहे. मात्र पुणतांबे येथे उड्डाण पूल की भुयारी मार्ग होणार, याबाबत निर्णय नसल्याने दैनंदिन वाहन चालकासह ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोपरगाव, श्रीरामपूर व्हाया पुणतांबे या राज्यमार्गावर येथे रेल्वे फाटक येत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे रेल्वेगाड्यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
पूर्वीचे रेल्वे फाटक बंद करून पुढे पश्चिमेकडे साधारण तीनशे मीटर अंतरावर नवीन रेल्वे फाटक झाले आहे या ठिकाणी कोपरगाव, श्रीरामपूर रस्त्याबरोबरच चांगदेव मंदिर व मातुलठाणकडे जाणारा रस्ता असल्याने फाटक बंद आणि उघडल्यानंतर वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. त्यामुळे वाहनधारकांना विलंबाने मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या ठिकाणी उड्डाण पूल होणार म्हणून रेल्वे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे मोजमाप करून जमिनीची खोदाई करून मुरूम किती फुटांवर याची तपासणी करून सुमारे चार वर्षाचा काळ लोटला आहे मात्र, रेल्वे फाटकाच्या पूर्व दिशेला रस्त्यावर येणार्या वळणामुळे उड्डाण पुलास अडचण येते, म्हणून भुयारी मार्ग व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रेल्वे विभाग जिल्हाधिकारी, बांधकाम विभागांकडे पाठपुरावा सुरू होता भुयारी मार्गासाठी गेल्या तीन-चार वर्षी पूर्वी रेल्वे विभागाला ना हरकत दाखला दिला आहे.
दरम्यान, कोपरगाव-श्रीरामपूर रस्ता चौपदरी करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. या कामामुळे स्टेशन रस्त्यावरील दुकानदार विस्थापित होण्याची शक्यता आहे.
याआधीच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत बी. ओ. टी. तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले होते मात्र यावरही सध्या काहीच कार्यवाही दिसत नाही. उड्डाण पुलासाठी जळगाव रस्ता तसेच चांगदेवनगर रस्त्यांची पाहणी करण्यात आली होती.उड्डाण पुलामुळे स्टेशन रस्त्यावरील दुकानदार विस्थापित होणार आहेत.
त्यामुळे अनेकांनी निवेदन देऊन भुयारी मार्ग करावा, अशी मागणी केली होती. मात्र, या प्रश्नांवर दोन-तीन वर्षांत कोणताही तोडगा निघाला नसल्याने याबद्दल केवळ चर्चाच सुरू आहे.
रेल्वे फाटक बंद होऊन वाहतूक ठप्प
दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील पुणतांबे येथील रेल्वे मार्गावर गेट असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
जवळपास सर्वच रेल्वे फाटक बंद होऊन भुयारी मार्ग करण्यात आले आहे. चांगदेव नगर येथे व शिर्डी मार्गावर दोन भुयारी मार्ग करण्यात आलेले आहे परंतु पुणतांबे येथे अद्यापी गेटच आहे. या ठिकाणी उड्डाण पूल की भुयारी मार्ग याबाबत मार्ग अद्यापि निर्णय झालेला दिसत नसून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.