कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई सुरु आहे(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
:
03 Feb 2025, 5:02 am
Updated on
:
03 Feb 2025, 5:02 am
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाई सुरूच ठेवली आहे. कारवाई दरम्यान 120 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठ्यावर 25 हजार रूपये इतक्या रक्कमेची दंड आकारणी करण्यात आली. या कारवाईमुळे प्लास्टिकचा सर्रास वापर करणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी (दि.31) महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 3/क प्रभाग परिसरातील दुकानांची पाहणी केली असता, या पाहणी दरम्यान किरण स्टोअर या होलसेल दुकानात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा आढळून आला. या दुकानात तब्बल 120 किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने संबंधित दुकानदारावर 25 हजार रूपये इतका दंड आकारण्यात आला. महानगरपालिकेने यापूर्वीही अशी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे.
सदर कारवाई महापालिका परिमंडळ -1 चे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3/क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, अधिक्षक उमेश यमगर, स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ वड्डे यांच्या पथकाने केली. महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने उपाययोजना राबविण्यात येत असून अनधिकृतरित्या प्लास्टिक साठवणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.