मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारून दोन महिने झाले तरी अद्याप ते वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. त्यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा आहेत. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे.
”महाराष्ट्र एक असं राज्य आहे जे कायम अंधश्रद्धेविरोधात लढत आला आहे. इथे अंधश्रद्धा चालत नाही. सामाजिक सुधारणांबाबतीत महाराष्ट्र कायम एक पाऊल पुढे राहिला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अंधश्रद्धा आली. काल माझा प्रश्न एवढाच होता की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही. याचं उत्तर रामदास कदमांनी द्याव. एकनाथ शिंदे, भाजपच्या प्रवक्त्यांनी द्यावं. देवेंद्र फडणवीस त्यांचं कुटुंब तिथे राहायला का जात नाही. तिथे काही मिरच्या आहेत, लिंबू आहेत असं काही मी म्हटलेलं नाही. मी फक्त एवढंच विचारलं की तुम्हाला कसली भिती वाटतेय. तिथे असं काय घडलंय. की घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे. लोकं वर्षावर जाण्यासाठी धडपडतायत. कधीतरी मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री बनून. मी प्रथमच पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही बंगल्यावर, आमच्या अमृता वहिणींनी जावंस वाटत नाही. अनामिक भितीमुळे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बदलायचे सुरू आहे, वर्षा बंगला पाडून नव्याने बांधायचे सुरू आहे, असं काय घडलंय तिथे. भिती कसली आहे”, असे संजय राऊत म्हणाले.