सात महिन्यांपूर्वी रोहित शर्माच्या हिंदुस्थानी संघाने केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती निकी प्रसादच्या युवतींच्या (19 वर्षांखालील) संघाने केली. त्रिशा गोंगडीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर हिंदुस्थानी युवतींनी दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटनी धुव्वा उडवत 19 वर्षांखालील महिलांच्या टी-20 चे जगज्जेतेपद राखण्याचा आनंद द्विगुणीत केला.
हिंदुस्थानी संघाच्या युवतींनी 2023 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत जगज्जेतेपदाचा मान मिळवला होता, तर आज तोच आनंद पुन्हा साजरा करताना दक्षिण आफ्रिकेचे 83 धावांचे माफक लक्ष्य 12 व्या षटकांतच गाठले आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ असल्याचे पुन्हा दाखवून दिले.
हिंदुस्थान नॉनस्टॉप आणि अपराजित
हिंदुस्थानच्या युवतींनी या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत आपल्या खेळाची कमाल करताना सलग सात विजयांची नोंद करत आपलीच सत्ता असल्याचे सिद्ध केले. हिंदुस्थानने या स्पर्धेत खेळत असलेल्या सात वेगवेगळय़ा संघाचा धुव्वा उडवत आपली ताकद दाखवून दिली. विशेष म्हणजे हिंदुस्थानने सर्व सामने एकतर्फी विजयासह जिंकल्या. साखळी सामन्यात त्यांनी विंडीजचा 44 धावांत तर मलेशियाचा 31 धावांत खुर्दा उडवला. तसेच श्रीलंकेलाही 58 धावांत रोखत 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर सुपर सिक्समध्ये बांगलादेश आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांचीही धुळधाण उडवली. स्कॉटलंडविरुद्ध 1 बाद 208 अशी जोरदार मजल मारल्यानंतर त्यांना 58 धावांतच गुंडाळले तर बांगलादेशला 8 बाद 64 धावांत रोखल्यावर 65 धावांचे आव्हान 7.1 षटकांत 2 फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.
चोहोदिशा फक्त त्रिशा
पारुनिका सिसोदिया, शबनम शकील आणि आयुषी शुक्लाने एकेक विकेट घेत आफ्रिकेची 3 बाद 20 अशी अवस्था केलीच होती. त्यानंतर कर्णधार कायला रेनेक आणि कारेबो मेसो यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्रिशा गोंगडीने ही जोडी फोडत दक्षिण आफ्रिकेचे पंबरडे मोडले. 44 धावांत अर्धा संघ गारद झाल्यानंतर माइक वॅन वूर्स्टने 18 चेंडूंत 23 धावा फटकावत संघाची मजल 74 पर्यंत नेली. मात्र त्रिशाने तिला बाद बाद करत आफ्रिकेला रोखले आणि पुढच्याच चेंडूवर सेशनी नायडूचा त्रिफळाही उडवला. परिणामतः दक्षिण आफ्रिकेचा डाव 82 धावांवर संपला. 15 धावांत 3 विकेट टिपल्यानंतर त्रिशाने फलंदाजीतही आफ्रिकन गोलंदाजीला फोडून काढण्याची किमया केली. आजच्या अंतिम सामन्यात चोहोदिशांना त्रिशाचाच जबजबा होता. कमलीनीबरोबर 36 धावांची सलामी दिल्यानंतर तिने सानिका चाळकेबरोबर 48 धावांची अभेद्य भागी रचत संघाच्या विजयावर 11.2 षटकांतच शिक्कामोर्तब केले. त्रिशाने 33 चेंडूंत 8 चौकारानिशी नाबाद 44 धावा ठोकल्या, तर सानिकाने 26 धावा काढल्या. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्रिशाने हिंदुस्थानला जगज्जेतेपद जिंकून तर दिलेच, सोबत ती अंतिम सामन्याच्या मानकरीसह मालिकेचीही मानकरी ठरली.
संयम अन् समर्पणामुळे यश – निकी प्रसाद
खेळाडूंचे संयम आणि त्यांच्या कामाच्या समर्पणामुळे संघाला हे जागतिक यश मिळाले आहे. स्पर्धेतील सुरुवातीचा सामना जिंकल्यानंतरही यशाचा आनंद स्वतःवर ओढवू दिला नाही आणि आपले काम करत राहिला. आम्हाला अंतिम सामना जिंकून आमची क्षमता दाखवायची होती. आम्हाला सर्वोत्तम सुविधा दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार, अशी भावना हिंदुस्थानची कर्णधार निकी प्रसाद हिने व्यक्त केली.