कला, क्रीडा महोत्सवात धारणी पं. स. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन:गतवर्षीही जिंकली होती कला महोत्सवाची जनरल ट्रॉफी
2 hours ago
1
जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कला, क्रीडा महोत्सवाची चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी धारणी पंचायत समितीने जिंकली आहे. येथील विभागीय क्रीडा संकुल आणि सांस्कृतिक भवनात तीन दिवसांपासून हा महोत्सव सुरू होता. धारणी पंचायत समितीने गतवर्षीही एकाहून एक सरस कला सादर करून सांस्कृतिक महोत्सव जिंकला होता. या यशाची घोषणा होताच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. विजेत्या चमूला जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती देशमुख होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा क्रीडा महोत्सवाचे सचिव बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय खारकर व विलास मरसाळे, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, कृषिविकास अधिकारी मलप्पा तोडकर, क्रीडा संयोजक डॉ. नितीन उंडे, उपसंयोजक पंकज गुल्हाने उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा व कला कुंभात अनेक प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, टेनिक्वाईट, बॅडमिंटन, टेबलटेनिस, कॅरम, बुद्धीबळ, जलतरण, धावणे, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी आदींचा समावेश होता. यापैकी बहुतेक खेळ प्रकारात धारणी पं. स.च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले कसब पणाला लावून यश खेचून आणले. या सर्व यशवंत महिला व पुरुष खेळाडूंना बक्षिसे वितरित करण्यात आली. सांस्कृतिकमध्ये धारणीचा संघ विजयी, तर अमरावतीचा संघ उपविजेता ठरला. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता लहाने व शैलेश दहातोंडे यांनी केले. प्रसिद्धी समितीचे विनायक लकडे, शकील अहमद, राजेश सावरकर व श्रीनाथ वानखडे यांनी या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये पुरुष विभागात नांदगाव खंडेश्वर विजयी, तर तिवसा पं. स.चा संघ उपविजेता ठरला. क्रिकेटमध्ये महिला विभागात चांदूर बाजार विजयी, तर धामणगावचा संघ उपविजेता ठरला. खो खो पुरुष विभागात धारणी विजयी व चिखलदरा उपविजेता झाला. खो खो महिला विभागात दर्यापूर विजयी व नांदगाव उपविजेता. कबड्डीत पुरुष विभागात धारणी विजयी व चिखलदराचा संघ उपविजेता झाला. कबड्डी महिला विभागात अमरावती विजयी, तर चिखलदरा उपविजेता ठरला आहे. व्हॉलीबॉल पासिंग पुरुषमध्ये चांदूर बाजार तर महिलांमध्ये नांदगाव खंडेश्वरने बाजी मारली. व्हॉलीबॉल स्ट्रोकमध्ये दर्यापूरने बाजी मारली. फुटबॉलमध्ये अमरावती मुख्यालयाने बाजी मारली असून, धामणगाव पं. स.चा संघ उपविजेता ठरला आहे. असे आहेत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे काही निकाल
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)