Published on
:
02 Feb 2025, 11:30 pm
Updated on
:
02 Feb 2025, 11:30 pm
स्टॉकहोम : सीमेवर तैनात असलेले सैनिक हे देशाचे सामर्थ्य दर्शवतात. जीवाची पर्वा न करता सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करतात. जगभरातील अनेक देशांनी युद्ध प्रसंगांचा सामना केला आहे. देशाचे रक्षण करताना जगातील अनेक देशांचे जवान शहीद होतात. मात्र, जगात एक असा देश आहे ज्या देशात आजपर्यंत एकही सैनिक शहीद झालेला नाही. या देशाचे नाव आहे स्वित्झर्लंड. या देशात आजपर्यंत एकही सैनिक युद्धात शहीद झालेला नाही. स्वित्झर्लंड हा तटस्थ भूमिका घेणारा देश आहे. 1815 मध्ये व्हिएन्ना काँग्रेसनंतर स्वित्झर्लंडने ‘कायम तटस्थतेचे’ धोरण स्वीकारले. तब्बल 200 वर्षांपासून स्वित्झर्लंड तटस्थ भूमिकेवर कायम आहे.
स्वित्झर्लंडने घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळेच हा देश कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघर्षात किंवा युद्धात सहभागी होत नाही. यामुळेच पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांसारख्या मोठ्या संघर्षातही स्वित्झर्लंड देश तटस्थ भूमिकेत होता. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे स्विस लष्कराचे मुख्य उद्दिष्ट आहे. या देशाचे सैन्य अतिशय सुव्यवस्थित आणि प्रशिक्षित आहे. स्विस लष्कराच्या जवानांना फक्त देशाच्या संरक्षणासाठी तयार केले गेले आहे.
स्वित्झर्लंडच्या सैन्यात अनिवार्य लष्करी सेवांचा देखील समावेश आहे. येथे वेगळी सैन्य भरती होत नाही. येथे सर्व पात्र नागरिकांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून ते आवश्यक असल्यास देशाचे रक्षण करू शकतात जगातील जवळपास सर्वच देश स्वित्झर्लंडच्या तटस्थ भूमिकेचा आदर करतात. त्यामुळेच कोणताही देश यांच्या सैन्यावर हल्ला करत नाही. तसेच स्वित्झर्लंड कोणत्याही थेट लष्करी संघर्षात सहभागी होत नाही. याचा परिणाम म्हणजे स्विस सैनिकांना युद्धभूमीवर हौतात्म्य पत्करावे लागले नाही. यामुळे आतापर्यंत स्विस लष्कराचा एकही जवान शहीद झालेला नाही.