महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांला लाथ मारणं आणि त्यांच्याशी हुज्जत घालणं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या दोघांवर कठोर कारवाई केली आहे. कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही तीन वर्षासाठी निलंबित केलं आहे. परिषदेचा हा निर्णय दोन्ही पैलवानांसाठी अत्यंत मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयावर आता शिवराज आणि महेंद्र काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीही सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पंच अडून बसले
दरम्यान, अंतिम सामना पार पडल्यानंतर पंचांनीही आक्रमक भूमिका घेतली. शिवराज राक्षेवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आखाड्यातून उठणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिला. तर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय जागचं हलणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
तर एक कोटी देईन
दरम्यान, पंचाच्या निर्णायवर शिवराज राक्षेने जोरदार आक्षेप घेतला आहे. माझे दोन्ही खांदे जमिनीला टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. तुम्ही रिमो बघितला नाही. डायरेक्ट निर्णय देऊन टाकला. माझी अपिल चेक करायला हवी होती. ही कुस्ती नव्हतीच. हा निर्णय योग्य नाही. हा निर्णय जर योग्य असेल तर मी 1 कोटीचं बक्षीस द्यायला तयार आहे, असं आव्हानच शिवराज राक्षेने दिलं आहे.
बोलून नाही, करून दाखवणार
दरम्यान, यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझं आज स्वप्न पूर्ण झालं आहे. आजोबांनी मला लहानपणापासून डाव शिकवले. कुस्ती शिकवली. आमच्या घरातील मोठ्या लोकांनीही कुस्तीचं बाळकडू दिलं. त्याचंच हे फळ मिळालं आहे, असं पृथ्वीराज मोहोळ म्हणाला. कुस्तीतील वादावरही त्याने भाष्य केलं आहे. वाद घालणारा मोठा पैलवान आहे. ते डबल केसरी पैलवान आहेत. पण मी त्या घटनेचा निषेध करतो. सिकंदर यांच्या कुस्तीनंतर वाद झाला होता. मात्र, शांत राहून पुन्हा जिंकलो. आता मी पुढची तयारी करत आहे. मी पुढे काय करणार हे बोलून दाखवणार नाही, तर करून दाखवणार आहे, असंही त्याने सांगितलं.