रत्नागिरी ः मोबाईल टॉवर बॅटरी चोरी प्रकरणातील चार संशयित व मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी.pudhari photo
Published on
:
02 Feb 2025, 5:52 pm
Updated on
:
02 Feb 2025, 5:52 pm
रत्नागिरी ः रत्नागिरी शहर आणि पावस परिसरामधील मोबाईल टॉवरच्या बॅटर्या चोरणार्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. संशयितांकडून तब्बल 6 लाख 27 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
राहुल कुंदन तोडणकर (वय 29, रा. शिवलकरवाडी आलावा जाकिमिर्या, रत्नागिरी), शुभम नीलेश खडपे (24, रा. गोडावून स्टॉप नाचणे,रत्नागिरी), मुस्तफा गुड्डू पठाण (22, रा.गोडावून स्टॉप नाचणे, रत्नागिरी) आणि विकास महेश सुतार (19, रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोबाईल टॉवर बॅटर्या चोरीचे अनेक प्रकार सुरु होते.
या बाबत पूर्णगड पोलिस ठाणे आणि शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी केल्यानंतर त्यांनी पावस व रत्नागिरी शहर परिसरातील विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पूर्णगड पोलिस ठाण्यातील चार आणि शहर पोलिस ठाण्यातील एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने व साहित्य असा एकूण 6 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलिस हेड काँस्टेबल विजय आंबेकर, दिपराज पाटील, अमित कदम आणि पोलिस नाईक दत्तात्रय कांबळे यांनी केली.