वर्धा : अवैध दारू प्रकरणात अटक न करण्याकरिता २५०० रुपयांची लाच स्वीकारणार्या पोलिस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी (रेल्वे) येथील चौकात लाच स्वीकारताना सिंदी (रेल्वे) पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मनोहर रामदास चांदेकर (वय ५७) यास ताब्यात घेण्यात आले. तक्रारदारावर अवैध दारूच्या वाहतूकीबाबत गुन्हा दाखल होता. याबाबत दाखल गुन्ह्यात अटक न करण्याकरिता मनोहर चांदेकर याने २५०० रुपयांची लाच मागितली. पडताळणी दरम्यान २५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. २५०० रुपयांची लाच स्वीकारल्याने मनोहर चांदेकर यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षन अधिकारी वैशाली वैरागडे, पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, संदीप मुपडे, मंगेश गंधे, प्रशांत वैद्य, पंकज डहाके, पंकज टाकोने, गणेश पवार, मेश्राम, राखी फुलमाळी, मनीष मसराम, लक्ष्मण केंद्रे, प्रीतम इंगळे, विनोद धोंगडे, बादल देशमुख यांनी केली.