अमरावती, पुढारी वृत्तसेवा:
पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या लेखी स्वरुपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अमरावती येथे दिले.
पोलीस मुख्यालयात शनिवारी (दि.१) डॉ. भोयर यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवरकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलिस आणि त्यांचे कुटुंबीय यांना होत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. संवादामधून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या समोर येत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. याबाबत राज्यस्तरावर समिती सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे आणि निवास व्यवस्था आहे. या ठिकाणी आवश्यक ती तरतूद करून समस्या मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
पोलीस कुटुंबीय कायम दुसर्याच्या संरक्षणासाठी तयार असतात. मात्र पोलीस कर्तव्यावर असताना त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. आज संवादामध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांवर दखल घेण्यात येईल. या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरुपात मागविण्यात येऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगीतले.
पोलीस आयुक्त रेड्डी यांनी सांगितले की, निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन बांधकामे हाती घेण्यात आली आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघत आहे. कार्यक्रमात डीसीपी बारवरकर यांनी प्रास्ताविक केले तर विशाल आनंद यांनी आभार मानले.