नागपूर : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय स्तरावर आयोजन करण्याचा मान नागपूरला मिळाला असून हे संमेलन दर्जेदार व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे. या संमेलनाने नागपूर, विदर्भातील नाट्यचळवळीला उर्जितावस्था येईल, असे मत नागपूर विभागीय नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाट्यपरिषदेचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांनी शनिवारी (दि.१) व्यक्त केले. १०० व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या तयारीला श्री नटराज पूजनाने प्रारंभ झाला.
नागपूर विभागातील हे नाट्य संमेलन येत्या मार्च महिन्यात होणार असून त्याच्या तयारीची सुरुवात शनिवारी (दि.१) विष्णूजी की रसोई येथे श्री नटराज पूजनाने व घंटा वाजवून करण्यात आली. यावेळी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे कार्यवाह व मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन गिरी, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते देवेंद्र दोडके, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर आंबोणे, बापू चनाखेकर, डॉ. निलकांत कुलसंगे, किशोर आयलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. हे विभागीय संमेलन सर्वसमावेशक व्हावे, यासाठी सर्व रंगकर्मींनी एकत्र येऊन कार्य करावे, असेही आवाहन डॉ. गिरीश गांधी यांनी यावेळी केले.
नरेश गडेकर यांनी नाट्यसंमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तर अजय पाटील यांनी विदर्भातील सर्व रंगकर्मी या संमेलनासाठी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल शेबे यांनी केले तर आभार नरेश गडेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला नाट्यपरिषदेचे नितीन पात्रीकर, किशोर डाऊ, प्रशांत मंगदे, प्रदीप धरमठोक, संजय जीवने, वत्सला पोलकमवार, आसावरी तिडके, कुणाल गडेकर, संजय भाकरे, देवेंद्र लुटे, संजीवनी चौधरी, डॉ. दीपाली घोंगे, रमेश भिसीकर, संजय वलीवकर, मीना देशपांडे, विवेक खेर, महेश पातुरकर, स्वप्निल बन्सोड, सारिका पेंडसे यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.