धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट, मुख्यमंत्री फडणवीसही दिल्लीत; प्रचाराचे कारण, पण 'राजीनामा' मुख्य मुद्दा
1 day ago
1
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत. राज्यात त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला असताना आज ते दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत. या दौऱ्यात ते केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज दिल्लीला जाणार असल्यामुळे राष्ट्रीय राजधानीत मुंडेंच्या राजीनाम्यावर खल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी यासंबंधी काही पुरावेही त्यांच्याकडे सुपूर्द केलेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेत. फडणवीस, मुंडेंची दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता धनंजय मुंडे आपल्या दौऱ्यात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपल्या विभागाशी संबंधित मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची राष्ट्रीय राजधानीत भेट होऊन त्यांच्यात मुंडे यांच्या राजीनाम्याच्या शक्यतेवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. अंजली दमानियांचा कोर्टात जाण्याचा इशारा विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसेच या प्रकरणी कारवाई न करणाऱ्या प्रत्येकाला प्रतिवादी करण्याचेही सूतोवाच केले आहे. यामुळेही मुख्यमंत्री फडणवीस व धनंजय मुंडे यांच्या एकाच दिवशी होणाऱ्या दिल्ली दौऱ्याकडे बारकाईने पाहिले जात आहे. बीड प्रकणात आतापर्यंत 150 जणांची चौकशी दुसरीकडे, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी व एसआयटीच्या माध्यमातून आतापर्यंत 150 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यात वाल्मीक कराड यांच्यासह त्याची पत्नी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे आदींचा समावेश आहे. वाल्मीक कराडलवा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पण त्याचा देशमुख यांच्या हत्येतही हात असल्याचा आरोप केला जात आहे. राखेचा व्यवसाय लाभाचे पद ठरत नाही दरम्यान, धनंजय मुंडे मंगळवारी परळी औष्णिक विद्युत प्रकल्पाची राख उचलण्याचा व्यवसाय लाभाचे पद ठरत नसल्याचा दावा केला होता. यासंबंधी ते म्हणाले होते की, तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा 2006 चा जीआर पाहिला तर थर्मल पॉवर स्टेशनची राख हा त्या - त्या थर्मल पॉवर स्टेशनने तयार केलेला कचरा आहे. तो कचरा स्वतः थर्मल पॉवर कंपनीने आपले पैसे खर्च करून उचललाच पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. अशा निर्णयाच्या बाबतीत हे थेट सरकारशी संलग्नित नाही. महानिर्मिती हे वेगळे मंडळ आहे. त्यामुळे मुलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनेफिटचा अर्थात लाभाच्या पदाचा विषय कुठे येत नाही.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)