धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मविआ राज्यभर आक्रमक होणार:विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात ४ दिवसांत बैठक
3 hours ago
1
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचा सहभाग आढळून येत आहे. म्हणून त्यांच्या राजीनामा मागण्यांसंदर्भात मविआ राज्यभर आक्रमक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उद्धवसेनेच्या कार्यालयात मविआची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला, असे सूत्रांनी सांगितले. परभणीतील घटनेसंदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा झाली असून, येत्या काळात बीड, परभणी संदर्भात विरोधकांची भूमिका ठरवण्यात येणार आहे. गेल्या एक महिन्यापासून विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. त्यावर येत्या चार दिवसात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच मविआच्या नेत्यांची एकत्र बैठक मंगळवारी झाली. विधिमंडळाच्या समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या ५१ सदस्यांना समितीमध्ये सदस्य म्हणून घेतले जाते. मात्र, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संख्या कमी असल्याने एका आमदाराला दोन समित्यांमध्ये सहभाग देण्याची मागणी केली जाणार आहे. उद्धवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका घेतल्यानंतर आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली होती. विधानसभेतील पराभवानंतर मविआची एकही बैठक झाली नसल्याने शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पवारांची भेट घेतली. त्यापाठोपाठ मंगळवारी मविआची एकत्रित बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पुन्हा नेते एकत्र येणार मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या १० दिवसात पुन्हा तीनही पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे कळते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)