नरसय्या आडम मास्तरांची संसदीय राजकारणातून निवृत्ती:सलग चौथ्यांदा पराभवानंतर निर्णय; पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार

2 hours ago 1
सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला आहे. त्यानंतर आडम मास्तरांनी हा निर्णय घेतला आहे. आयुष्यभर सामाजिक चळवळीत काम करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. यापुढे केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडणुकीमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आडम मास्तर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव स्वीकारावा लागला. हा त्यांचा सलग चौथा पराभव आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातून यावेळी महाविकास आघाडी आडम मास्तरांना संधी देईल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने येथून चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आडम यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र कोठे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे आता आडम मास्तरांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे आणि माकपचे नेते नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आडम मास्तरांनी प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता. त्याचा फायदा देखील शिंदे यांना झाला. प्रणिती शिंदे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त असलेल्या विधानसभेच्या जागेवर आडम मास्तरांनी पुन्हा एका तयारी सुरू केली होती. तसेच त्यासाठी माकपकडून 'नोट भी दो, वोट भी दो' अभियान राबवण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीने नरसय्या आडम यांच्यासाठी ही जागा सोडली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा या मतमदारसंघातून निवडणूक लढवली. यात त्यांचा पराभव झाला. कोण आहेत नरसय्या आडम कॉम्रेड नरसय्या आडम हे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जात. माकपचे नेते म्हणून त्यांची ओळख असून त्यांना आडम मास्तर म्हणून देखील ओळखले जाते. सोलापूर शहरातून ते तीन वेळा विधानसभेवर निवडून आले होते. 1978, 1995 आणि 2004 च्या निवडणुकीत सोलापूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सलग प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांसोबत त्यांचे राजकीय विरोधाचे नाते तयार झाले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तर पुन्हा विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. मोदींच्या सभेतील उपस्थितीवरुन झाले होते निलंबन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते नरसय्या आडम (मास्तर) यांच्यावर पक्षाच्या पॉलिट ब्युरोने केंद्रीय समितीतून निलंबनाची कारवाई केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्ताने सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी नरसय्या आडम यांनी मोदी यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून भाषण करीत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. विडी कामगार व इतर कष्टकरी समाजासाठी त्यांनी हाती घेतलेल्या 30 हजार घरांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे कारण देत माकपने त्यांना निलंबित केले होते. लोकसभा निवडणुकीत मोदींवर टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघात 15 हजार घरांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नरसय्या आडम मास्तरांनी मोठे कष्ट घेतले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत आडम मास्तर यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली होती. मोदींचा पराभव करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे आडम मास्तरांनी सोलापुरात म्हटले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा देखील घेतल्या. यावेळी आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान घरावर झाली होती दगडफेक माजी आमदार तथा सोलापूर शहर मध्यचे माकपचे उमेदवार असलेले नरसय्या आडम यांच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. आडम मास्तरांनी या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप केला होता. आडम यांचे सोलापूर शहरातील बापूजीनगर भागात घर आहे. या घरावर रात्री दगडफेक करण्यात आली होती. ही घटना घडली तेव्हा नरसय्या आडम प्रचारासाठी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घराबाहेर गेलेले होते. त्यामुळे आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी ही बाब वकील अनिल वासम यांना कळवली. त्यानंतर त्यांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून स्थितीवर नियंत्रण मिळवले होते. विशेष म्हणजे पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही दगडफेक करणाऱ्या तरुणांचा गोंधळ सुरू होता. आडम मास्तरांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर केला होता आरोप माकपचा काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीत समावेश होता. तरी देखील नरसय्या आडम यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी आपल्या घरावर झालेल्या दगडफेकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे. माझ्या घरावर दगडफेक करत गोंधळ घालणारे कार्यकर्ते काँग्रेसचे असण्याचा संशय आहे. ते मद्यपान करून माझ्या घरावर दगडफेक करत होते. त्यांना थांबवताना वकील अनिल वासम यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. भविष्यात माझ्यावरही हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे सदर तरुणांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे आडम मास्तरांनी या प्रकरणी म्हटले होते. आडम मास्तरांची कारकीर्दही थोडक्यात पहा.... कामगारांसाठी दिवसातील बारा-चौदा तास काम करणारा व दरवाजा कोणासाठीही केव्हाही उघडा ठेवणारा नेता म्हणून माकप नेते नरसय्या आडम यांची ओळख आहे. कामगारांचे लढे ते रस्त्यावर तर लढलेच; पण त्याचबरोबर अगदी न्यायालयातही कामगारांच्या बाजूने स्वतंत्रपणे खटले त्यांनी लढवले. सोलापूर शहरामध्ये मोठे मोर्चे काढणारा अलीकडच्या काळातील एकमेव नेता म्हणजे आडम मास्तर, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. माकपने त्यांच्यावर पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्यत्वाची धुरा सोपवली होती. सध्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद महाराष्ट्रात खूपच खालावलेली आहे. मुंबईत आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून पक्षाचे नगण्य असे प्रतिनिधित्व आहे. 1978 ते 90 च्या दरम्यान डाव्या विचारांच्या पक्षांची एकत्रित ताकद उभी करत असताना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला मोजले जावे अशी थोडीबहुत स्थिती तेव्हा होती; पण आता पक्षाची एकूणच अवस्था राज्यात खूपच कठीण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन करण्याचे, त्यासाठी युवकांना, महिलांना, मध्यमवर्गीयांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे वळवण्याचे मोठे काम नरसय्या आडम यांच्यावर सोपवण्यात आले होते. सोलापूरसारख्या गिरणगावात कामगारांच्या हितासाठी अखंड संघर्ष करणारा लढवय्या नेता म्हणून त्यांना महाराष्ट्रात ओळखले जाते. विधानसभेत विरोधाची खिंड एकतर्फी लढवणारी, सत्ताधार्‍यांच्या विरोधात आग ओकणारी बुलंद आवाजातील तोफ म्हणून आडम यांची ख्याती होती. महापालिकेतील नगरसेवकांची बैठक असो किंवा विधानसभेचे अधिवेशन असो, ध्वनिक्षेपकाची गरज न भासता खणखणीत आवाजात सभागृह दणाणून सोडणारा, सरकारला मुद्दय़ावर रोखून धरणारा नेता म्हणून आडम यांना सगळीच नेते मंडळी ओळखत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मूलत: अतिशय खालच्या केडरमध्ये काम केलेला हा कार्यकर्ता नगरसेवक, आमदार तसेच पक्षपातळीवर विविध जबाबदार्‍या पार पाडत पक्षाच्या केंद्रीय समितीपर्यंत गेला होता. एकेकाळी मुंबईसारख्या गिरणगावातून, औद्योगिक पट्टय़ातून बर्‍यापैकी ताकद असलेला कम्युनिस्ट पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत विस्कटलेला होता. आणीबाणीनंतर 1978 च्या विधानसभा निवडणुकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 9 आमदार विधानसभेत गेले. तेव्हा लोकसभेतही सीपीएमचे तीन खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले होते. अर्थात हे जे काही प्रतिनिधित्व सीपीएमला मिळाले ते केवळ स्वत:च्या ताकदीवर होते असे नाही, आणीबाणीमुळे निर्माण झालेला लोकप्रक्षोभ आणि जनता पक्षाची साथही त्यामागे होती. संख्येने कमी असलो तरी जेवढे काही सर्मथन तेव्हा मिळाले होते त्यात पक्षाला वाढ तर करता आली नाहीच; पण उलट प्रतिनिधित्वाचा होता तेवढा आकडाही खालावत गेला. 1990 ते 2000 च्या दरम्यान तीन आमदार, तर आता सध्याच्या विधानसभेत सीपीएमचा एकही आमदार नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article