Published on
:
17 Nov 2024, 7:21 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:21 am
नांदगाव : ग्राम पंचायतीच्या हद्दीत विना परवानगी पोस्टर्स, बॅनर्स व झेंडे लावल्याप्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढतीतील चार उमेदवारांविरोधात आचार संहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सैंदाणे यांनी दिली.
गिरणानगरच्या ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांनी याबाबत फिर्याद दिली होती. शहरालगत असलेल्या गिरणानगर ग्राम पंचायतीच्या हद्दीत नांदगाव-चाळीसगाव शिवारात हनुमान मंदिरापासून काही अंतरावर ग्राम पंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक ठिकाणी सुहास कांदे, समीर भुजबळ, गणेश धात्रक, डॉ. रोहन बोरसे यांच्या प्रचाराचे फलक लावण्यात आले होते.
मालमत्तेचे विद्रुपीकरण केले म्हणून ग्रामसेविका आहेर यांच्या तक्रारीनुसार नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्याने मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.