नांदिवडे : येथे जनप्रबोधन सभेस मार्गदर्शन करताना अॅड. रोशन पाटील.pudhari photo
Published on
:
07 Feb 2025, 1:10 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:10 am
गणपतीपुळे : दोन महिन्यांपूर्वी जयगड परिसरात जिंदल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक मुलांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतरही या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध असतानाही कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता कंपनीने मनमानी केली, तर कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन नवी मुंबई येथील अभ्यासू नेतृत्व अॅड. रोशन पाटील यांनी नांदिवडे येथे आयोजित प्रबोधन सभेत दिले.
जिंदल कंपनी या परिसरात राखेचे ढीग मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवून प्रदूषण करत आहे. तसेच गोडावूनमध्ये कोळसा न साठवता इतरत्र साठवलेला आहे. या सर्वांचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. पर्यावरण खाते कुठे आहे, असाही प्रश्न लोकांनी उपस्थित केला.
येणार्या काळात या परिसरातील आरोग्य, जैवविविधता, पर्यटन या सर्व बाबी अबाधित राहाव्यात तसेच या सर्व विषयांवर सविस्तर साधक-बाधक चर्चा व्हावी, या हेतूने नांदिवडे- जयगड येथे जनप्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध लोकोपयोगी आंदोलनामध्ये आजपर्यंत मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग असलेले, संविधानाविषयी प्रदीर्घ अभ्यास असलेले नवी मुंबई येथील या विषयातील जाणकार अॅड. रोशन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या सभेला जयगड दशक्रोशीतून सुमारे 700 हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ही सभा शांततेत पार पडली.
प्रबोधन सभेत मार्गदर्शन करताना अॅड. पाटील म्हणाले की, जयगड दशक्रोशीचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरामध्ये विविध उद्योगसमूह व्यवसाय करण्यासाठी आले. सुरुवातीला इथल्या स्थानिक तरुण-तरुणींना, व्यवसाय-धंदा मिळेल, येथील आरोग्य, पायाभूत सुविधा सुधारतील हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून येथील सर्वसामान्य जनतेने आपली वडिलोपार्जित जागा कवडीमोल दराने या उद्योग समूहांना विकली. कंपन्यांना जागा मिळाली, उद्योगधंदे उभे राहिले; मात्र दुर्दैवाची बाब अशी की, आज मागे वळून पाहिले तर ना नोकरी-धंदा ना पायाभूत सुविधा, ना आरोग्य यंत्रणा. उलट या सर्वचस्तरावर मोठ्या प्रमाणात त्रास होताना पाहायला मिळतो आहे. यात सर्वसामान्य जनता भरडलेली पाहायला मिळत आहे. आपल्या परिसरात उद्योग-धंदे आलेच पाहिजे, यात तीळमात्र शंका नाही; मात्र हे उद्योग या ठिकाणी येऊन इथल्या सर्वसामान्य जनतेचे अस्तित्व संपवत असतील तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी संविधानिक पद्धतीने या संदर्भात आवाज उठवला पाहिजे. जिंदल उद्योग समुहाने ग्रामस्थांच्या या सभेची दखल घेवून पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.
संविधानिक चळवळीला साथ द्यावी : गवाणकर
या सभेच्या माध्यमातून आपल्यासमोर सध्या असलेले किंवा त्या माध्यमातून आपल्यासमोर भविष्यात येणारे भीषण वास्तव मांडत आहोत. एखाद्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा एखाद्या औद्योगिक समूहावर हेतुत: आरोप करणे हा उद्देश नसून, जे विचार पटतील त्यावर आपण विचारमंथन करून भविष्यातील संविधानिक चळवळीमध्ये साथ देण्याचे आवाहन या बैठकीत स्थानिक ग्रामस्थ प्रथमेश गवाणकर यांनी केले.