अजितदादांनी चार दिवसांपूर्वी मला फोन केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. FILE
Published on
:
07 Feb 2025, 4:01 am
Updated on
:
07 Feb 2025, 4:01 am
नाशिक : राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. यातच, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांच्याशी फोनव्दारे संवाद साधला आहे. याबाबत, अजितदादांनी चार दिवसांपूर्वी मला फोन केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. आपण एकदा बसून बोलूया, असे पवारांनी म्हटल्याची त्यांनी सांगितले.
भुजबळ यांनी माध्यमांशी मुंबईत संवाद साधला. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ नाराज आहेत. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय, फेकले काय, काय फरक पडतो? मंत्रिपदे किती आली किती गेली. भुजबळ संपला नाही, असे त्यांनी जाहीर सभांमधून सांगितले होते. तसेच भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तुमच्याशी संपर्क साधला का? असे विचारले असता भुजबळ म्हणाले, शिर्डीच्या अधिवेशनासाठी मला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी येण्याची विनंती केली होती. तेव्हा मी शिर्डीला गेलो होतो. चार दिवसांपूर्वी अजितदादांचा सुध्दा मला फोन आला होता. मी उशिरा फोन करतोय, मी दिलगिरी व्यक्त करतो, आपण एकदा बसून बोलूया, असे पवारांनी म्हटल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
भुजबळांची मिश्कील टिप्पणी
अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरू असताना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तुमची नाराजी दूर झाली आहे का? असे विचारले असता भुजबळ म्हणाले, माझे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे काम होते. त्यामुळे मी त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. कोणी म्हणतो नाराजी कमी झाली तर कोणी म्हणतो नाराजी वाढली, त्याचे थर्मामीटर लावून पाहिले पाहिजे, म्हणजे नाराजी कमी झाली की जास्त झाली हे समजेल, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी यावेळी केले.