Published on
:
07 Feb 2025, 6:37 am
Updated on
:
07 Feb 2025, 6:37 am
नेरळ : नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस टीमने आणखी एक दमदार कामगिरी करीत एका गुन्ह्यातील आरोपीला मुद्देमालासह थेट भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे. मोहम्मद आरिफ जुम्मन अहमद चौधरी असे आरोपीचे नाव आहे. नेरळ कल्याण या राज्य मार्गावरील शेलु परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईडवरील साहित्य चोरी प्रकरणात पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एका फरार आरोपीस लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकारी ढवळे यांनी सांगितले आहे.
शेलू परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईडवर अज्ञात चोरट्यांनी 23 जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास टेम्पो भरून साहित्य चोरी केले होते. या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या घटनेच्या ठिकाणाहून नेरळ पोलिसांनी सुरू केलेला तपास चोराच्या घरापर्यंत जावून पोहचला होता. 100 सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज चेक करीत आपल्या खबर्याच्या माध्यमातून पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात जावून पोहचली. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती पिकअप टेम्पो हा चोरीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. याबाबत कल्याण खडकपाडा या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
तपासाची चक्रे फिरवत नेरळ पोलिसांनी पडघा येथे रस्त्याच्या कडेला असणारा चोरीच्या टेम्पोची चौकशी केली असता हा टेम्पो मोहम्मद आरिफ जुम्मन अहमद चौधरी हा चालवत असल्याचे पोलिसांना समजले.पोलिसांनी शिताफीने मोहम्मद याला पकडले आणि खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. मोहम्मद हा मूळचा भिवंडीतील येवईनाका,बीएमसी ऑफिस समोर बापगाव येथील राहणारा आहे.या गुन्ह्यात आणखी एक साथीदार असून त्यांचे नाव अनिल विश्वकर्मा असून तो अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.नेरळ पोलिसांनी चोरीला गेलेले पाच लाकडी दरवाजे, दोन हॅमर मशीन, कटर मशीन,दोन राखाडी लांबीचा एक पंच,आठ डोअर किट असलेले बॉक्स असा एकूण 44 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.