Published on
:
07 Feb 2025, 8:08 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:08 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफर्सची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.
केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी छबी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांच असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम, अपूर्वा कवडे या नव्या दमाच्या कलाकारांसह अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर,संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत.
कोकणातील गावात फोटोग्राफर असलेल्या फोटोग्राफरची एक रंजक कथा 'छबी' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर नक्कीच यामध्ये सस्पेन्स, थ्रिलर, रोमांस नक्कीच अनुभवता येणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येतोय. प्रत्येक छबीत एक गोष्ट असते अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता पडद्यावर उलगडणार आहे. नव्या-जुन्या कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी असलेला, नावीन्यपूर्ण गोष्ट असलेला "छबी" चित्रपट पाहण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.