Published on
:
07 Feb 2025, 6:44 am
Updated on
:
07 Feb 2025, 6:44 am
डोंबिवली : ऑटो रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन, हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) आणि गॅस बाटला टेस्टिंग संदर्भात ऑटो रिक्षांचे चालक आणि मालक अनभिज्ञ आहेत. या तिन्ही कामांच्या संदर्भात रिक्षा-टॅक्सीच्या चालक आणि मालकांना उचित माहिती जाहीर फलकांमार्फत देण्यात यावी, याकडे भाजपाच्या वाहतूक सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
1 फेब्रुवारी पासून मुंबई महानगरसह उपनगर प्रादेशिक परिवहन विभागातील ऑटो रिक्षासह टॅक्सीच्या भाडे दरात वाढ करण्यात आली आहे. याच तारखेपासून मीटर कॅलिब्रेशनच्या कामास सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु आठवडा उलटूनही मीटर कॅलिब्रेशन संदर्भात कुठलीही हालचाल दिसत नाही. यासंदर्भात वाहतूक सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी मंत्री आणि आयुक्तांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधताना मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थांचे नाव व पत्ते ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकांना उपलब्ध करून द्यावेत.
सदर मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थेकडे अधिकृत परवाना वैद्य ट्रेड सर्टिफिकेट आणि परिवहन कार्यालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार सर्व बाबी दर्शनी भागास लावण्यात याव्यात. त्या उपलब्ध आहे की नाही यासंदर्भात माहिती देखील उपलब्ध व्हावी. तसेच मीटर कॅलिब्रेशनचे दरावर बंधन असावे. कारण मीटर कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थेचे चालक मनमानी पद्धतीने चालकांकडून आकारणी करत असतात, असा आमचा आजवरचा अनुभव असल्याचेही माळेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या कारभारावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष ठेवावे. यात चालकांची लूट होता काम नये, अशीही मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
परिवहन आयुक्तांनी 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य (बंधनकारक) केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेकरिता वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करण्यासाठी, तसेच छेडछाड आणि बनावटीगिरी रोखणे, आदी अनेक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच रस्त्यावर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्याकरिता मोटर वाहनांवरील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेचे आम्ही स्वागतच करतो. परंतु त्यांचे सेंटर्स कुठे असतील ? कोणत्या एजन्सीला हे काम देण्यात आले ? ही सर्व माहिती परिवहन विभागाने प्रत्येक शहरामध्ये दर्शनी भागात फलक लाऊन रिक्षा/टॅक्सी चालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. रिक्षा चालकांना कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेल्या सेंटर्सची माहिती अद्यापही अवगत नाही. त्यामुळे ही माहिती प्रदर्शित करावी, याकडे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी लक्ष वेधले आहे.
एक वर्षापूर्वी गॅस बाटल्याच्या टेस्टिंगसाठी आकारले जाणारे दर 700 रूपयांवरून डायरेक्ट 2200 झाले होते. असेच दर दोन वर्षांपूर्वी वाढले होते. तेव्हा संघटनेकडून आंदोलनाची हाक दिल्यानंतर परिवहन विभागाने हे दर 2200 वरून 700 ते 800 रूपयांवर आणले. आताही तशीच परिस्थिती रिक्षा/टॅक्सी चालकांवर ओढवली आहे. 2800 रूपये दर बाटल्यास टेस्टिंगच्या संस्था चालकांनी सर्रास आकारण्यास सुरुवात केली आहे. परिवहन विभागाचे मंत्री आणि आयुक्तांनी यावर बंधन/अंकुश ठेवावा. संबंधित संस्था चालकांना समक्ष बोलावून पूर्वीचे आकारले जाणारे 700 ते 800 रूपये असलेले दर आता एकदम 2800 रूपयांवर कसे पोहोचले ? याचा खुलासा करून त्यावर नियंत्रण आणावे. अन्यथा रिक्षा-टॅक्सी चालक/मालकांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.