रेल्वेच्या निळजे उड्डाण पुलाचे काम सुरूPudhari News Network
Published on
:
07 Feb 2025, 6:37 am
Updated on
:
07 Feb 2025, 6:37 am
नेवाळी : नवी मुंबई सह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण-शीळ मार्गावरील निळजे उड्डाणपूलाच्या पुर्नबांधणी कामाला बुधवारी (दि.5) मध्यरात्रीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
निळजे उड्डाण पुलाच्या कामामुळे जुना निळजे पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असून नविन पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. याठिकाणी कोणतीही कोंडी होऊ नये म्हणून वाहतूकीचे नियोजन करत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून देखील बंद असलेल्या रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. प्रवाश्यांना वेळेआधीच प्रशासनाने पूल बंदची माहिती दिल्याने सकाळच्या सुमारास तुरळक कोंडी व्यतिरिक्त कोठे ही वाहन कोंडी दिसून आली नाही. पुढील पाच दिवस हे काम सुरु रहाणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरु आहे. रेल्वेचा हा मार्ग निळजे रेल्वे उड्डाणपूलाखालून जात असन पूलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकण्यात आला आहे. या कामासाठी निळजे उड्डाणपुलाची लांबी वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने उड्डाणपूलाच्या पुर्नबांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी बुधवारी (दि.5)रात्री 1 वाजल्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जुन्या निळजे उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करुन ती नवीन उड्डाणपूलावरुन सुरु ठेवण्यात आली आहे. या कामाची बुधवारी (दि.5) मध्यरात्री स्थानिक आमदार राजेश मोरे यांसह स्थानिक पदाधिकार्यांनी पाहणी करून आढावा घेतला आहे.
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, बदलापूर यांसह उपनगरातून मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे शहराच्या दिशेने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी कल्याण-शीळ रोड हा एकमेव रस्ते मार्ग आहे. त्यामुळे कायम या मार्गावर वाहनांची कोंडी दिसून येते. कल्याण-शीळरोडचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले असून रुंदीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पेंडिंग आहे. त्यातच या मार्गावर मेट्रोचे खांब टाकण्याचे काम हाती घेण्यात आल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या लेन बंद करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यात आता काटई-निळजे उड्डाणपूल बंद केल्याने या कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.