Published on
:
07 Feb 2025, 6:43 am
Updated on
:
07 Feb 2025, 6:43 am
उरण | राजकुमार भगत
उरण शहर आणि ग्रामीण भाग तसेच एनएडी, जीटीपीएस सारख्या प्रकल्पांना पाणी पुरवठा करणार्या एमआयडीसीच्या पाईप लाईनला करळ इंटरचेंज जवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.याची झळ उरणच्या नागरिकांना बसत आहे. दुरुस्ती आणि देखभालीकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
उरण तालुक्यातील 24 ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएजीसी, बीपीसीएल सारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना या पाईपलाईनवरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र एमआयडीसीच्या दुर्लक्षित पणामुळे वारंवार पाणी पुरवठा करणार्या पाईप लाईनला गळती लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे.त्यात दास्तान- उरण मार्गावर करळ इंटरचेंज जवळ एमआयडीसीच्या पाईप लाईनला मागील कित्येक दिवसांपासून गळती लागली आहे. या गळती कडे एमआयडीसीचे अभियंता जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अगोदरच उरण तालुक्यात पाणी टंचाई असते मात्र या गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असून या वाया जाणार्या पाण्यामुळे येथिल नाले भरले असून परिसरात तळे साठले आहे.
अपुर्या पावसामुळे धरणात पाणीसाठा कमी
यावर्षी राज्यात पावसाळ्यात पडलेल्या पावसाचं प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठा हा कमी आहे.त्यामुळे यावर्षी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना हा करावा लागणार आहे.त्यात एमआयडीसीया गळतीकडे दुर्लक्ष करत आहे. या पाईपलाईनवर अनेक टपरी धारक आणि छोटे व्यावसायिक यांना अनधिकृत जोडण्या जोडल्या आहेत त्याचा परिणाम जेएनपीएच्या पाणीपुरवठ्यावर होत असतो. त्यामुळे एमआयडीसीने पाईप लाईनला लागलेली गळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.