शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आमच्याकडे येणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वच्या सर्व खासदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत. आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही, अशी ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देशाई, संजय जाधव, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
काय म्हणाले होते उदय सामंत?
एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही. एकनाथ शिंदे यांनी जे काम केलं त्यासाठी मिशन राबवण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेणारी शिवसेना चालते. त्यामुळे अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत. निश्चित आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे, हे निश्चित आहे, असं उदय सामंत म्हणाले होते.
मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसात 10 ते 12 माजी आमदार उबाठा आणि महाविकास आघाडीचे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. यावर मी आजही ठाम आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व चांगलं असल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
उरले सुरलेही येतील
सर्वच येणार आहेत.राहिलेले सर्वच येणार आहेत. तिकडे काही राहिलेले नाही. त्यांच्या मेन नेत्यांचीही इकडेच एन्ट्री होणार आहे. आठ दहा दिवसात त्यांचा प्रवेश होणार आहे. तो जो बडबड करतोय, तोही एकदोन दिवसात येणार आहे, असं आमदार संतोष बांगर म्हणाले.