मंत्री प्रताप सरनाईकfile photo
Published on
:
07 Feb 2025, 3:47 am
Updated on
:
07 Feb 2025, 3:47 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
परिवहन मंत्री असल्यामुळे आपल्यालाच राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष करावे, याबाबत प्रताप सरनाईक यांनी पाठविलेला प्रस्ताव नाकारत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली आहे. ही एकप्रकारे सरनाईक यांच्या मोहाला वेसण घातली असल्याचे बोलले जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अध्यक्षपदी नियमानुसार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. आतापर्यंतच्या इतिहासात एन. सुंदरामन हे पूर्णवेळ अध्यक्ष ठरले आहेत. मात्र, या पदावर राजकीय सोय म्हणून आतापर्यंत पी. के. अण्णा पाटील, गोविंदराव आदिक, शिवाजीराव गोताड, सुधाकर परिचारक आणि जीवनराव गोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जीवनराव गोरे यांना अध्यक्षपदाहून दूर केले. या विरोधात गोरे यांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु, रावते यांनी केंद्रीय परिवहन कायद्यात सुधारणा करून घेतली. त्यानुसार एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री नियुक्त झाले. रावते यांच्यानंतर शिवसेनेचे अनिल परब एसटीचे अध्यक्ष झाले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एसटीचे अध्यक्ष झाले. केंद्रीय कायद्यात पुन्हा दुरुस्ती झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले आमदार भरत गोगावले यांची एसटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु एसटीचे अध्यक्षपदही आपल्यालाच मिळावे यासाठी सरनाईक यांनी संजय सेठी यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदरचा प्रस्ताव नाकारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेठी यांचे नियुक्ती करत सरनाईक यांना धक्का दिला आहे.