कोट्यवधी खर्चूनही अशुद्ध पाणी; खानापूरमधील स्थितीPudhari
Published on
:
07 Feb 2025, 7:00 am
खडकवासला: पानशेत रस्त्यावरील सर्वाधिक आठ हजार लोकसंख्येच्या खानापूर (ता. हवेली) येथील नागरिकांसह पर्यटकांचे आरोग्य अशुद्ध पाण्यामुळे धोक्यात आले आहे. दुसरीकडे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट अवस्थेत सोडून ठेकेदार पसार झाला आहे.
गेल्या वीस वर्षांत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी खानापूर येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चाच्या चार पाणी योजना राबविल्या. जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, थेंबभर शुद्ध पाणी नागरिकांना मिळाले नाही.
अगोदरच्या पाणी योजना फसल्याने शासनाने 8 मार्च 2023 रोजी जलजीवन मिशन योजनेंतर्गत 3 कोटी 90 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले. या निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पासह सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून पाण्याची टाकी आदी कामे अर्धवट अवस्थेत सोडून ठेकेदार पसार झाला आहे.
खानापूर गाव व परिसरात दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या अशा आजारांने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे प्रशासन सुस्तावले आहे.
खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर व ग्रामस्थांनी याबाबत पाणीपुरवठा विभागासह जिल्हा परिषदेला वेळोवेळी कळवूनही काम अर्धवट आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत खानापूर येथील अर्धवट पाणी योजनेवर वरिष्ठ अधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले. मात्र, काम सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी योजनेचे काम अर्धवट अवस्थेत आहे.
हवेली तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी म्हणाले, जलजीवन योजनेच्या अर्धवट कामाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे.
दूषित पाण्यामुळे साथीचे आजार होऊ नयेत यासाठी पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी खानापूर येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीने सहा जणांचे बळी घेतले होते, तर तीनशेहून अधिक नागरिकांना लागण झाली होती. अशा घटना घडूनही प्रशासन शुद्ध पाणीपुरवठा योजना राबविण्यात अपयशी ठरले आहे, अशी तक्रार माजी सरपंच शरद जावळकर यांनी केली आहे.
हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच माजी सरपंच मुरलीधर जावळकर, अनिल जावळकर आदींनी अर्धवट पाणी योजनेचे काम महिन्यात पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सिंहगड भागातील सर्व गावांत दूषित पाणी
खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे म्हणाले, खानापूरसह सिंहगड भागातील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व दहा गावांत अशुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जुलाब, उलट्यांच्या रुग्णांची संख्या कमी आहे.
यापूर्वी पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. मात्र, एकाही योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला नाही. नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का?
- शरद जावळकर, माजी सरपंच, खानापूर