हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत बँकर तसेच कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील वरळी परिसरात 202 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. Zapkey.com ने दिलेल्या माहितीनुसार, शिवसागर निवासी संकुलात 202 कोटी रुपयांना सी फेसिंग अपार्टमेंटस् खरेदी केले आहेत.
मुंबईतील वरळी सी फेसिंग असलेल्या मालमत्तांची किंमत कोट्यवधींच्या घरात असून, या विभागात घर घेणं हे अनेक प्रतिष्ठितांचे स्वप्न असते. उदय कोटक आणि कुटुंबाने वरळीमध्ये सी फेसिंग 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 12 मालमत्ता खरेदी केल्या आहे. या मालमत्तांचा प्रति चौरस फूट 2.71 लाख इतका दर आहे. कागदपत्रांनुसार, या व्यवहारांमध्ये त्यांची पत्नी पल्लवी कोटक, त्यांची मुले जय आणि धवल कोटक आणि त्यांचे पालक सुरेश आणि इंदिरा कोटक यांनी केलेल्या खरेदीचाही समावेश आहे.
उदय कोटक यांनी घेतलेली ही मालमत्ता चौरस फुटांचा विचार केल्यास, आत्तापर्यंत देशभरातील विक्री झालेल्या मालमत्तांमधील सर्वाधिक रक्कम आहे. शिवसागर ही इमारत समुद्राच्या समोर असल्यामुळे, वरळी परिसरातील हा विभाग पाॅश मानला जातो. याठिकाणी अनेक नामांकित सेलिब्रिटी राहतात.