शारिरीक स्वास्थ्य उत्तम राहण्याकरिता स्वत:साठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी महिलांशी संवाद साधताना दिला.Pudhari News Network
Published on
:
07 Feb 2025, 7:00 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:00 am
डोंबिवली : आजच्या महिलेवर घरातल्या जबाबदाऱ्यांसह कामाच्या अर्थात नोकरीच्या ठिकाणी प्रचंड ताण असतो. याच ताण-तणावाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ होऊ शकतो. मात्र शारिरीक स्वास्थ्य उत्तम राहण्याकरिता स्वत:साठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी महिलांशी संवाद साधताना दिला. (Indu Rani Jakhar, Commissioner of Kalyan-Dombivli Municipal Corporation)
4 फेब्रुवारी या जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि फोर्टीज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महानगरपालिकेच्या मुख्यालयातील पुरूष कर्मचाऱ्यांसाठी ओरल स्क्रिनिंग व महिला कर्मचाऱ्यांकरिता आयोजिलेल्या ब्रेस्ट स्क्रिनिंग आणि मोफत कर्करोग स्क्रिनिंग शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्वत:च्या LIFE STYLE आणि EATING HABITS चांगल्या पद्धतीने ठेवल्या तर महिला निश्चितपणे स्वत:चे स्वास्थ उत्तम राखू शकतील. फोर्टीजच्या सहकार्याने गुरूवारी संपन्न झालेल्या कर्करोग तपासणी शिबीराचा लाभ महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना निश्चितच होईल, असे विश्वास व्यक्त करत आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी फोर्टीज हॉस्पिटलने केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रथमच एक महिला विराजमान झाल्या आहेत. एक महिला आयुक्त म्हणून महिलांना जाणवणाऱ्या शारिरीक समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना या बाबी लक्षात घेऊन स्वत: पुढाकार घेऊन आयुक्त डॉ. जाखड यांनी हे शिबीर फोर्टीज हॉस्पिटलच्या साह्याने महानगरपालिकेच्या कल्याण मुख्यालयात आयोजित केले होते. या शिबीराचा लाभ महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला. या शिबीरात हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ. हर्षित शहा आणि डॉ. उमा डांगी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, त्यांची लक्षणे, निदान व त्यावरची उपचार पध्दती या संदर्भात उपस्थितांना महत्वपूर्ण माहिती विशद केली. या शिबीराचे आयोजनात हॉस्पिटलच्या माधवी वारीक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली होती.
या शिबीराला केडीएमसीच्या कर निर्धरक व संकलक विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. प्रतिभा पानपाटील, आदी अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी प्रास्ताविक केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. सतेजा शर्मा, डॉ. रश्मी ठाकूर, डॉ. रेखा दौंड यांच्यासह वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन महापालिकेच्या प्रभागात देखील करण्याचा मानस असल्याची इच्छा केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी व्यक्त केली.