उत्तर प्रदेशातील बरेली कोतवाली भागात दोन महिला सुंदर कपडे घालून, छान तयार होऊन आपल्या पतीसोबत घराबाहेर पडत होत्या. त्या ऑटोमध्ये बसायच्या आणि पतीसोबत बँकेबाहेर जाऊन उभ्या रहायच्या. धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढंस काम करून त्या दोन्ही महिला लाखो रुपये कमावत होत्या. अतिशय शानदार, आलिशान आयुष्य जगायच्या. मात्र त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांना पकडल्यावर जे सत्य समोर आलं ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोलिसही हैराण झाले. नेकम काय होतं ते प्रकरण, जाणून घेऊया.
बरेली पोलिसांनी एसओजीच्या मदतीने एका अनोख्या दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. दरोडेखोरांनी दरोड्यासाठी आपापल्या पत्नींचा वापर केला. दरोडेखोर बँकेतून बाहेर पडलेल्या निष्पाप पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट करायचे. ते त्यांच्या बायकांना छान तयार व्हायला सांगायचे आणि त्यांना बँकेबाहेर वेगवेगळ्या ऑटोरिक्षात बसवायचे. बँकेतून पैसे काढून बाहेर येणारे साधेसुधे लोक हे एखाद्या रिक्षाची वाट पहायचे, अशा लोकांना ते टार्गेट करायचे. त्यानंतर ते त्यांना फसवून ऑटोत बसवून दूर न्यायचे आणि तेथे त्यांच्याकडील पैसे काढून लुटायचे. सध्या एसओजीच्या मदतीने पोलिसांनी दोन पती-पत्नी जोडप्यांसह अशा पाच जणांना अटक केली आहे. त्यांनी लुटलेली सुमारे एक लाख रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. आपण आत्तापर्यंत 8 दरोडे टाकल्याचे त्यांनी कबूल केलं आहे. या दरोडेखोरांची सखोल चौकशी केल्यानंतर आणखी घटनांचाही उलगडा होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आदिल आणि शाबा हे पती-पत्नी आहेत. असगर आणि नूरी हे देखील पती-पत्नी आहेत. पाचवा दरोडेखोर उस्मान अली हा या टोळीचा सल्लागार आहे. त्याच्या सांगण्यावरून नवरा-बायको हे नवनवीन स्टाईलने दरोडे घालायचे. या टोळीचा म्होरक्या म्हणजे नूरी असून ती तिच्या मैत्रिणी शाबासोबत ही संपूर्ण दरोडेखोर टोळी चालवत असे.
अशी करायचे लूट
खरे तर, गेल्या वर्षभरात बरेली जिल्ह्यात बँकांमधून बाहेर पडणाऱ्या लोकांसह लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसओजी टीम तैनात केली होती. उस्मान अली महिन्याच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात बँकांमध्ये जाऊन पेन्शन आणि पगार काढणाऱ्या अशा लोकांची रेकी करत असे. तर आदिल आणि असगर हे त्यांच्या पत्नीसोबत दोन वेगवेगळ्या ऑटोतून जात असत. चांगले मेकअप आणि कपडे घालून ते त्यांच्या बायकांना आपापल्या ऑटोमध्ये प्रवासी म्हणून बसवायचे.
पेन्शन किंवा पगार काढल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती बँकेतून रिक्षाची वाट पाहत बाहेर उभी पडायची तेव्हा उस्मान अलीच्या सांगण्यावरून हे लोक त्यांना आपापल्या ऑटोमध्ये बसवायचे. आधीच प्रवासी म्हणून सुंदर बसलेली त्यांची पत्नी अशा लोकांना ऑटोरिक्षात बसायला मदत करायची. ते निष्पाप लोक दरोडेखोर महिलांना प्रवासी समजून सहज फसायचे. यानंतर हे लोक बँकेतून दूर गेल्यावर ऑटो खराब झाल्याचा बहाणा करायचे आणि नंतर रवासी म्हणून बसलेल्या निरपराध लोकांना लुटायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी आतापर्यंत आठ जणांसोबत अशाच प्रकारच्या लुटमारीच्या घटनांची कबुली दिली आहे. त्यांचे अेक कोड वर्डही होते, पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीचे लाखभर रुपये जप्त केलेत.