Published on
:
07 Feb 2025, 3:46 am
Updated on
:
07 Feb 2025, 3:46 am
नाशिक : भारतात अवैधरीत्या प्रवेश करून नाशिकमधील आडगाव परिसरात एका बांधकाम ठेकेदाराकडे मजुरीचे काम करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यापैकी ७ जण दोन महिन्यांपूर्वी नाशिकला आल्याचे, तर एक जण सहा वर्षांपासून शहरात वास्तव्य करत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे. आठपैकी तिघांकडे भारताचे आधारकार्ड, पॅनकार्ड आढळून आले आहेत.
अलीकडे बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरीत्या प्रवेश करून राहत असल्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. त्यातच आता नाशिक शहरातून पोलिसांनी मोठी कारवाई करीत आठ बांगलादेशी नागरिकांना पकडल्याने हा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनांनुसार शहर पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्माणाधीन इमारत बांधकामासाठी बांगलादेशी नागरिकांचा मजूर म्हणून वापर होत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुमारे चार ते पाच दिवस तपास करीत आठ जणांची धरपकड केली. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितल्यानंतर त्यांना ते देता न आल्याने पोलिसांनी त्यांना अटक करीत त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अंचल मुद्गल, सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके, माळी, सहायक उपनिरीक्षक शेरखान पठाण, किशोर देसले, बाळू बागूल, नामदेव सोनवणे, हवालदार गणेश वाघ, प्रवीण वेटाळ, मनीषा जाधव, वैशाली घरटे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलिस बनले पर्यवेक्षक अन् मजूर ..
ज्या ठिकाणी बांगलादेशी राहत होते, त्या ठिकाणी सुमारे ६०० मजूर काम करतात. त्यामुळे त्यातून बांगलादेशींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वेशांतर करीत तेथे पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक व मजूर म्हणून चार ते पाच दिवस काम केले. तसेच बांगलादेशींच्या भाषा व संवादावरून त्यांची ओळख पटवून त्यांना पकडले. या बांगलादेशींचे नातलग त्यांच्या मूळ देशात असल्याचे समजते.
पोलिस तपासात संशयित सुमन गाझी हा १२ वर्षांपासून भारतात आल्याचे समोर आले आहे. सहा वर्षे पुण्यात राहून त्यानंतर तो नाशिकला आला. इतर सात संशयित दोन महिन्यांपूर्वी नाशिकला आल्याचे समजते. त्यांच्याकडे सखाेल चाैकशी सुरू आहे. या संदर्भात दहशतवादविरोधी पथक व इतर विभागांमार्फतही चौकशी केली जाणार आहे. बांगलादेशींविराेधात भारतात अवैधरीत्या प्रवेश करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. यापुढेही बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम सुरू राहणार आहे.
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर
कागदपत्रे, रहिवासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
आठपैकी तीन बांगलादेशींकडे भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळून आले आहे. तसेच ते शहरात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. त्यामुळे शासकीय कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांसह बांगलादेशींची शहानिशा न करता त्यांना कामावर ठेवणाऱ्यांसह निवारा उपलब्ध करून देणाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे बांगलादेशी नागरिक कोलकाता येथील बँक खात्यांत पैसे पाठवत असून, त्यानंतर ते बांगलादेशात पाठवले जात असल्याचा संशय वर्तवला जात आहे.
सुमन कालाम गाझी (२७), अब्दुल्ला अलीम मंडल (३०), शाहीन मफिजुल मंडल (२३), लासेल नुरअली शंतर (२३), आसाद अर्शदअली मुल्ला (३०), आलीम सुआनखान मंडल (३२), अलअमीन आमीनुर शेख (२२), मोसीन मौफीजुल मुल्ला (२२) अशी बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.