नांदेडच्या पोटनिवडणुकीत भावनिक लाटेविरुद्ध व्यूहरचनेची लढाई:5 महिन्यांपूर्वी 61 % मतदान, तर आता 67.81% नोंद
3 days ago
2
जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व ९ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. विधानसभेसाठी ६९.४५ टक्के, तर लोकसभा पोटनिवडणुकीत गेल्यावेळेच्या तुलनेत ७ टक्के अधिक ६७.८१ टक्के मतदान झाले. नांदेड लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रा. रवींद्र चव्हाण व भाजपकडून डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्यात चुरशीची लढत आहे. स्व. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेसला भावनिक लाट तारणार की भाजपची व्यूहरचना कामी येणार याची उत्सुकता आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश करूनही स्व. वसंतराव चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. दुर्दैवाने त्यांचे अवघ्या तीन महिन्यांत निधन झाले. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, मुखेड देगलूर व नायगाव हे सहा मतदारसंघ येतात. नांदेड शहरात मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार असून नांदेड लोकसभा मतदारसंघात दलित मतांची व्होटबँक त्यांच्याकडे आहे. तसेच भावनिक लाटही पाठीशी आहे. त्यामुळे काँग्रेस व महाविकास आघाडीची बाजू मजबूत आहे. भाजपला या वेळी सहा मतदारसंघांत विधानसभा दिग्गज उमेदवारांची साथ मिळाली आहे. त्यामुळे तळागाळात काम करणारी चांगली फळी भाजपच्या बाजूने आहे. त्यातच भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या अॅड. श्रीजया चव्हाण उमेदवार असल्याने या मतदारसंघातून मताधिक्य मिळेल, अशी आशा भाजपला आहे. तसेच मुखेड, नायगाव, देगलूर येथे भाजपचे, तर नांदेड दक्षिण, उत्तर येथे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली आहे. अशा स्थितीत भाजपची बाजू मजबूत असून अशोक चव्हाण आणि भाजपच्या सूक्ष्म नियोजनाने चमत्कार घडेल, अशी आशा भाजपला आहे. दोन्ही पक्षांचे राजकीय गणित लक्षात घेता सध्या तरी चुरशीची लढत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या लढतीच्या निकालाकडे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. उद्या नांदेड विद्यापीठात मतमोजणी, तयारी झाली पूर्ण उद्या २३ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नॉलेज रिसोर्स सेंटरमध्ये सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर विधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळ्यावर खोली क्रमांक १०२ व खोली क्रमांक ६ या ठिकाणी ६ विधानसभा क्षेत्रांची मतमोजणी होणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)