Published on
:
20 Nov 2024, 1:22 pm
Updated on
:
20 Nov 2024, 1:22 pm
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 56 ते 57% मतदान झाले. शेवटच्या तासाभरात काही ठिकाणी मतदारांच्या रांगा असल्याने यावेळी मत टक्का वाढण्याची चिन्हे आहेत. आज महिलांमध्ये विशेष उत्साह होता. यामुळे भाजप शिवसेना महायुतीची लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरणार की परिवर्तनाच्या भूमिकेतून काँग्रेस महाविकास आघाडीला विदर्भात कौल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागात सोयाबीन व इतर शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी व शहरात युवकांमध्ये, महिलात काहीसा महागाई,बेरोजगारी संदर्भात संताप दिसला. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघात वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना भाजपने बोगस मतदान करण्यास लावल्याच्या तक्रारीवरून वातावरण तापले. मध्य नागपुरात नाईक तलाव बांगलादेश परिसरात काँग्रेसकडून पैसे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारींनी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तातडीने पोलीस व निवडणूक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. यावेळी मतदार यादीतील घोळाच्या तक्रारी लोकसभेच्या तुलनेत कमी होत्या. काटोल विधानसभा मतदारसंघातील घटनेनंतरही काटोल, सावनेर, रामटेक, कामठी या मतदारसंघात ईव्हीएम संदर्भातील काही तक्रारी वगळता मतदान शांततेत झाले.
नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पाहता हिंगणा - ५५.७९ ,कामठी ५३.४५,काटोल ५९.४३,नागपूर मध्य ५०.६७,नागपूर पूर्व ५५.९८,नागपूर उत्तर५१.७०,नागपूर दक्षिण ५३.३६,नागपुर दक्षिण पश्चिम ५१.५४,नागपूर पश्चिम ५१.८९,रामटेक ६५. ५९,सावनेर ६४.२३ तर उमरेड विधानसभा मतदारसंघात ६७.३७ टक्के मतदान झाले.