Published on
:
23 Nov 2024, 1:10 am
Updated on
:
23 Nov 2024, 1:10 am
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा निवडणुकीतील मतदान आकडेवारीनुसार दोन्ही शिवसेनेच्या संघटनात्मक नेतृत्वांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शहर आणि तालुका प्रमुखांनी आपापली पदे शाबूत राहावीत यासाठी प्रचारावेळी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे; परंतु मतदानाच्या दिवशी काय करेल याचा अंदाज नसल्याने मिळणार्या मतांमध्ये आणि बांधलेल्या अंदाजांमध्ये तफावत निर्माण होते. त्याचे परिणाम संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांना भोगावे लागतात. भाजपमधील काही उदय सामंत विरोधी फॅन्स क्लबच्या नेत्यांमध्येही पद जाण्यासंदर्भात धाकधूक वाढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत झाली आहे. पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी शहर आणि तालुक्याच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत मताधिक्य घटू नये, असे परिणामकारक काम करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार शहर आणि तालुका पदाधिकार्यांनी प्रचारकार्य सुरू केले. हे काम करताना भाजप पदाधिकार्यांशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या; परंतु काही नेत्यांनी प्रचाराचे ठिकाण आणि वेळेसंबंधी चौकशी करण्यासाठी केलेले फोन स्वीकारले नसल्याच्या तक्रारी सुरू केल्या आहेत.(Maharashtra assembly polls)
भाजपच्या काही नेत्यांकडूनही युतीधर्म पाळला गेला नसल्याच्या तक्रारी ना. उदय सामंत यांच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे मताधिक्य वाढले किंवा नाही वाढले तरी ना. सामंतांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना संबंधित पदाधिकार्यांची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांचे राजकीय संबंध चांगले असल्याने दगाफटका करणार्या त्या भाजप पदाधिकार्यांना त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या संघटनात्मक नेत्यांची धाकधूक वाढणार आहे.