आचार संहितेअंतर्गत विविध कारवाईमध्ये नागपूर जिल्ह्यात ३९ कोटी ६० लाख रुपयांचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली File Photo
Published on
:
18 Nov 2024, 2:32 pm
Updated on
:
18 Nov 2024, 2:32 pm
नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी आता अवघे काही तास उरले असून मतदानासाठी निवडणूक विभाग सर्व सुरक्षा यंत्रणांसह सज्ज आहे. जिल्ह्यातील मतदार न चुकता मतदान करतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी पत्र परिषदेत व्यक्त केला. आदर्श आचार संहितेअंतर्गत सीमेवर नाकाबंदीत विविध कारवाईमध्ये नागपूर जिल्ह्यात ३९ कोटी ६० लाख रुपयांचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. यात दागिने, रोख रक्कम, मद्य, रेशन किट आदींचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त ग्रामीण पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात ४ हजार ६३१ मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. सूमारे ३ हजार ४६० मतदान केंद्राचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. शहरी भागात २ हजार १६९ म्हणजेच १०० टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होईल. ग्रामीण भागातील ५३ टक्के मतदान केंद्र म्हणजेच १ हजार २९१ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार असल्याची माहिती डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यात १२७ मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मायक्रो ऑब्झर्वर आणि खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तत्पर ठेवण्यात आले आहे.
विधानसभा मतदारसंघासाठी यंदा प्रथम चक्रीका या अॅपचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचारी व अधिकारी यांचा त्यांच्या जीपीएससह समन्वय ठेवता येणे शक्य होणार आहे.