नामदेवशास्त्रींनी राजकारणात न पडण्याचा पायंडा मोडला का?:पंकजा मुंडेंसोबतच्या वादात गडावर राजकारण न करण्याची घेतली होती भूमिका

3 hours ago 1
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन गडाची पर्यायाने वंजारी समाजाची ताकद भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभी केली आहे. शास्त्रींनी पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या कथित वादात गडावरून राजकारण न करण्याची भूमिका घेतली होती. पण आता त्यांनीच धनंजय यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी राजकीय वादात न पडण्याचा आपला पायंडा मोडला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप - शिवसेनेचे (संयुक्त) युती सरकार आले होते. त्यावेळी नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध केला होता. गड हे राजकारण करण्याचे स्थान नाही, असे ते म्हणाले होते. यामुळे या दोघांतही टोकाचे मनभेद निर्माण झाले होते. राज्यभर हे प्रकरण गाजले होते. कशी झाली होती वादाला सुरुवात? पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड हा वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे. भगवान बाबा यांना वंजारी समाजात संताचा दर्जा आहे. त्यामुळे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या गडावर लाखो वंजारी बांधव येतात. अर्थात ही परंपरा भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केली होती. ती 2015 पर्यंत सुरू होरती. पण गोपीनाथ मुंडे यांचे जूीन 2014 मध्ये अपघाती निधन झाले. त्यानंतर ही सूत्रे त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे आली. पंकजा यांनी 2015 मध्ये भगवान गडावर भव्य दसरा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे गोपीनाथ गड बांधण्यास सुरुवात केली. यामुळे नामदेवशास्त्री दुखावले गेले. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड बांधून भगवानगडाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतरच्या काळात नामदेव शास्त्री व पंकजा मुंडे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. परिणामी, नामदेव शास्त्री यांनी 30 सप्टेंबर 2016 रोजी पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध केला. याच कालावधीत पंकजा मुंडे यांनी नामदेवशास्त्रींविषयी केलेल्या एका विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर पंकजा व शास्त्रींमधील वाद आणखी विकोपाला पोहोचला होता. तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व नामदेवशास्त्री यांच्यातील वादानंतर जय भगवान महासंघाचे नेते बाळासाहेब सानप यांनी या दोघांनाही वाद मिटवण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी समाजाच्या ऐक्याचा दाखला दिला होता. अखेर नामदेवशास्त्रींनी एक पाऊल मागे घेत पंकजा यांनी भगवानगडाचे कुंपण सोडून खाली सभा घ्यावी असे स्पष्ट केले होते. पंकजा मुंडे यांनी गडापासून एक फर्लांगभर अंतरावर आपला मेळावा घ्यावा. गोपीनाथ मुंडे यांनीही आचारसंहिता असताना एक-दोनवेळा अशी सभा घेतली होती, असे ते म्हणाले होते. पंकजा ही गडाची लेक - नामदेवशास्त्री नामदेव शास्त्री यांनी या वादाप्रकरणी दिव्य मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केले होते. दिव्य मराठीने त्यांना 'पंकजा यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांची वारस तुम्हीच जाहीर केले होते. त्यांच्या भाषणांना तुम्ही विरोध केला नाही. मग पंकजांनाच विरोध का?' असा प्रश्न केला होता. त्यावर ते म्हणाले होते, मी कधीही पंकजाला मुंडेंचा राजकीय वारस म्हणून जाहीर केले नाही. ती गडाची लेक आहे. येथे येण्यासाठी तिला कोणालाही विचारण्याची गरज नाही. गोपीनाथरावांना अधिष्ठान नव्हते. म्हणून गडाने त्यांना मदत केली. पंकजाने 12 डिसेंबर 2015 रोजी गोपीनाथगडाची स्थापना केली. त्यावेळी तिनेच गोपीनाथगड हा राजकारणाचा व भगवानगड हा श्रद्धेचा, असे जाहीर केले होते. आपल्या शब्दाप्रमाणे तिने तेथे राजकारण करावे व श्रद्धेसाठी भगवानगडावर यावे. या वादाच्या पार्श्वभूमीसाठी गडाचा इतिहास समजून घ्या. 1951 मध्ये दसऱ्याला भगवान बाबांनी हा गड स्थापन केला. हा गड वारकरी पंथाचे सर्व जातींसाठीचे आध्यात्मिक व्यासपीठ आहे. भगवानबाबांनी 1965 पर्यंत प्रबोधनाची परंपरा चालवली. त्यानंतर राजपूत समाजाचे भीमसेन महाराज यांनी 39 वर्षे ती जपली. ही गादी कोणत्याही एका समाजाची नाही. 1993-94 दरम्यान गोपीनाथ मुंडे येथे आले. इतरांप्रमाणे हळूहळू तेही बोलू लागले. मुंडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माजी मंत्री बबनराव ढाकणे व त्यांच्यात वाद झाला. तिथपासून हा वाद सुरू आहे. भारजवाडीत शास्त्रींसोबत मुंडे बहिण-भाऊ आले होते एकत्र यानंतर पंकजा मुंडे व नामदेवशास्त्रींमधील वाद हळूहळू निकाली निघत गेला. भगवानगडाच्या 89 व्या फिरत्या नारळी सप्ताहाला महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. पाथर्डीच्या भारजवाडी गावात हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला नामदेव शास्त्रींसोबत पंकजा व धनंजय मुंडेही उपस्थित होते. यावेळी नामदेव शास्त्रींनी पंकजा व धनंजय यांना आपापसात न भांडण्याचा उपदेश दिला. पण त्याचवेळी पंकजा यांना अहंकार कमी करण्याचाही सल्ला दिला. 'पंकजा मुंडेंसोबत माझे वैर नाही, त्यांचे चमचे खराब आहेत. पंकजांनी अहंकार कमी करावा, स्वाभीमान ठेवा, अंहकार सोडा,' असे ते म्हणाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाद्वारे नामदेव शास्त्रींना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. 'माझ्या बोलण्याला, माझ्या उंचपुऱ्या व्यक्तीमत्वाला आणि लाखोंच्या जनसमुदायात बोलताना मोठा आवाज करण्याला अहंकार समजू नका. स्त्री बोलली तर तो अहंकार आणि एखादा पुरुष कितीही चुकीचा असला आणि तो बोलला तर त्याला वाघ समजणे ही तुमची मानसिकता आहे का?' असा खडा सवाल पंकजा यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता. नामदेवशास्त्री यांनी स्वतःचा पायंडा मोडला का? नामदेवशास्त्री यांनी बीडमधील कथित गुन्हेगारीविषयी अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांची उघड बाजू घेतली आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे राजकारणातच उडी मारली आहे. त्यामुळे नामदेव शास्त्री यांनीच भगवान गडावरून राजकारण न करण्याचा स्वतःच घातलेला पायंडा मोडीत काढला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नामदेव शास्त्री यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण वंजारी समाज एका झटक्यात धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभा केला. धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचा एक मोठा चेहरा आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. भाजपही यासाठी अनुकूल असल्याचे मानले जात आहे. पण आता नामदेवशास्त्री यांनी वंजारी समाजाची ताकद त्यांच्यामागे उभे केल्यामुळे हा एकप्रकारे भाजप व अजित पवारांना इशारा असल्याचे मानले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article