Maharashtra Election Result | इगतपुरीत सर्वाधिक २,२०९ मतांची नोंद
नाशिक जिल्ह्यात २३ हजार ९१ मतदारांची 'नोटा'ला पसंतीfile photo
Published on
:
25 Nov 2024, 3:57 am
Updated on
:
25 Nov 2024, 3:57 am
नाशिक : जिल्ह्यातील 15 मतदारसंघांत एकूण २३ हजार ९१ मतदारांनी नोटाला पसंती दिली. इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सर्वाधिक २ हजार २०९ नोटा मतांची नोंद झाली असून, चांदवड - देवळ्यात नोटाला सर्वात कमी म्हणजेच ४२४ पसंती मिळाली.
विधानसभा निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यात शनिवारी (दि. २३) 15 ही मतदारसंघांत एकाचवेळी मतमोजणी पार पडली. जिल्हावासीयांनी २०१९ ची पुनरावृत्ती करताना विद्यमान आमदारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. जिल्ह्यात बागलाण मतदारसंघात दिलीप बोरसे यांनी सर्वाधिक १ लाख २९ हजार २९७ विक्रमी मतांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. तसेच मालेगाव मध्यमधून मौलाना मुफ्ती हे सर्वात कमी म्हणजेच केवळ १६२ मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील या लढतींमध्ये साऱ्यांचेच लक्ष लागून होते ते नोटा (None of the above) मतांच्या आकडेवारीकडे.
15 मतदारसंघांतील २३ हजार ९१ मतदारांनी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमधून एकही उमेदवार नको म्हणून नोटाला पसंतीचे मत दिले. जिल्ह्यात इगतपुरीत सर्वाधिक नोटा मतांची नोंद झाली असून, त्या खालोखाल कळवण व नाशिक पूर्वमध्ये अनुक्रमे २,१७६ तसेच १,९८९ मतांची नोंद करण्यात आली. दरम्यान, एप्रिल - मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतून १४ हजार ४३१ नोटा मते नोंदविली गेली होती. त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील ६ हजार १८५ तसेच दिंडोरी मतदारसंघातील ८ हजार २४६ मतांचा समावेश होता. त्या तुलनेत विधानसभा निवडणूक नोटांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
नांदगाव 770, मालेगाव मध्य 1,089, मालेगाव बाह्य 1,539, बागलाण 1,573, कळवण 2,176, चांदवड 424, येवला 1,478, सिन्नर 1,831, निफाड 1,491, दिंडाेरी 1,673, नाशिक पूर्व 1,989, नाशिक मध्य 1,644, नाशिक पश्चिम 1,811, देवळाली 1,394, इगतपुरी 2,209, एकूण 23,091.