Published on
:
05 Feb 2025, 5:58 am
Updated on
:
05 Feb 2025, 5:58 am
वैभव धाडवे-पाटील
सारोळा : निरा-देवघर प्रकल्प कार्यालय उघडे ठेवून अधिकार्यांसह कर्मचारी गायब असल्याचे उघड झाले आहे. कार्यालयामध्ये पंचवीस लोक कामाला असताना फक्त तीन कर्मचारी व दोन शिपाई एवढेच लोक मंगळवारी दुपारी होते. अनेक टेबलांवरील वीज, पंखे चालू ठेवून कर्मचारी गायब झाले हाते. राज्य सरकारी कर्मचार्यांना पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत आहेत. अशा निष्क्रिय व बेजबाबदार कर्मचार्यांची हकालपट्टी, निलंबन करणे गरजे आहे.
निर-देवघर प्रकल्प कार्यालय सांगवी-भाटघर (ता. भोर) या कार्यलयात तब्बल 25 च्या आसपास अधिकारी- कर्मचारी काम करतात. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या जबाबदार्या; मात्र कित्येक वर्षे निरा-देवघर पुनर्वसनाचे प्रश्न, निरा-देवघर उजवा कालवा, गुंजवणी धरण पुनर्वसनन प्रश्न, गुंजवणी बंदिस्त पाइपलाइन, बंधारे, शेतीसाठी पाणी मागणी इतर विषयांसाठी सर्वसामान्यांची ये-जा असते. सर्वसामान्यांना टेबल कर्मचारी अथवा अधिकारी आलेच नसल्यामुळे चकरा मारण्याची वेळ येते.
शासनाने कामाला गती येण्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळा वाढवून पाच दिवसांचा आठवडा केला. सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 या वेळेत शासकीय कार्यालये सुरू राहावीत, असे स्पष्ट आदेश आहेत. परंतु, शासकीय अधिकारी व कर्मचार्यांकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नाही. शासकीय कार्यालयांतील अनेक कर्मचारी अजूनही जुन्याच पद्धतीने कामकाज चालवत आहेत. सकाळी 11 वाजताच्या पुढे येतात आणि 4 वाजताच गायब होतात. यातही उपस्थितीच्या वेळेत विविध कारणे सांगून हे कर्मचारी खुर्चीवर राहात नाहीत. या कर्मचार्यांत कधीच वेळेचे गांभीर्य आणि शिस्तपालन होत नसल्याचेच पाहायला मिळते. कामासाठी वारंवार कार्यालयात चकरा मारून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, या कर्मचार्यांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक कारवाई करावी; अथवा सहा दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी आता सामान्य जनतेतून होत आहे.
दुपारनंतर अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात. याबाबत विचारणा केली असता, ते कर्मचारी ‘दौर्यावर गेल्याचे’ सांगण्यात येते. अनेकांची वर्षानुवर्षे कामे झालीच नाहीत, या मागची कारणे काय? निरा-देवघर अधिकार्यांना व कर्मचार्यांना लागलेली बेशिस्त सवय पाहायला मिळत आहे.