Published on
:
02 Feb 2025, 11:48 pm
Updated on
:
02 Feb 2025, 11:48 pm
यॉर्कशायर : धावपळीचे जीवन, दिवसभर एकाच ठिकाणावर बसून काम करण्याचे वाढते प्रमाण, अतिरिक्त ताण यामुळे अनेकांचे आरोग्य ढासळू लागले आहे. कामाचा वाढता व्याप आणि दगदगीचे आयुष्य यात आपले शरीराकडे दुर्लक्ष होते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर, विविध अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून या समस्यांवर उपाय शोधण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अशाच एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणार्या कर्मचार्यांच्या व्यायामाचे प्रमाण वाढले असून, त्याचे आरोग्याच्या द़ृष्टीने सकारात्मक बदल दिसून आले आहेत.
यॉर्कशायर आणि हंबर भागातील बहुतांश कर्मचार्यांनी यात असे नमूद केले आहे की, वर्क फ्रॉम होममुळे त्यांचा कार्यालयात येण्या-जाण्याचा, प्रवासाचा वेळ वाचतो आणि तोच वेळ सत्कारणी लावता येतो. व्यायामासाठी वेळ काढता येतो. बेटर या धर्मादाय सामाजिक संस्थेने हा अहवाल सादर केला. त्यांनी एका कार्यशाळेच्या माध्यमातून कर्मचार्यांची त्यांच्या कार्यशैली आणि आयुष्याबाबत अभ्यास केला. यामध्ये कामाचा कर्मचार्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणार्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.
एनएचएसमध्ये काम करणार्या हल येथील रेबेका थॉम्पसन म्हणाल्या, रिमोट वर्कमोडमुळे तिला व्यायाम करण्यासाठी पुरेसा आणि अधिक वेळ मिळतो. कारण तिला प्रवास करण्याची गरज नसते आणि ती कामाच्या आधी व दुपारच्या जेवणाच्या वेळी व्यायाम करू शकते. यासह आता तिला सँडविच आणि कॅन्टीनमधील चिप्सवर अवलंबून राहावे लागत नाही. कारण, घरी स्वत: स्वयंपाक करून जेवत असल्यामुळे आहारदेखील अधिक पोषक झाल्याचे ती सांगते.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 25 टक्के लोकांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम केल्यामुळे त्यांची व्यायामाची क्षमता काहीशी वाढली, तर 16 टक्के लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे सांगितले. एनएचएसनुसार, नियमित व्यायाम करणार्या लोकांना स्ट्रोक्स, टाइप 2 डायबिटीस आणि कर्करोग यांसारख्या मोठ्या आजारांचा धोका कमी असतो. यामुळे नैराश्य तर कमी होतंच आणि एकूण मानसिक आरोग्यदेखील सुधारते. आठवड्यातून किमान 150 मिनिटं वेगवान चालणे, सायकल चालवणे किंवा नृत्य करण्यासारखा साधा व्यायाम केल्यास त्याचे सकारात्मक बदल पाहायला मिळतात. त्यामुळे निरोगी आयुष्याच्या द़ृष्टीने हलका व्यायामही उपयोगी पडतो.