निवडणुकीसाठी 35 क्षेत्रीय अधिकारी, 1472 मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती:शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात तीन मतदान केंद्र वाढली, दोन टप्प्यात प्रशिक्षण

6 hours ago 1
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या आदेशानुसार वाहन तपासणी नाके पोलिसांनी सुरू केले आहेत. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यातील ८ महसूल मंडळ, ११३ महसुली गावे, तर पाथर्डीत ६ मंडळे व १०१ महसुली गावांचा समावेश आहे. संपूर्ण निवडणुकीचे कामकाज शेवगाव तहसील कार्यालयातून चालणार आहे. यापूर्वीही शेवगावातूनच सर्व कामकाज चालत होते. यंदा शेवगाव तालुक्यात दोन, तर पाथर्डी शहरात एक, असे एकूण तीन मतदान केंद्र नव्याने वाढवण्यात आली आहेत. ३५ क्षेत्रीय अधिकारी, १४७२ मतदान अधिकारी नियुक्त केले असून, त्यासाठी दोन टप्प्यात या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. शेवगाव तालुक्यातील कर्हे टाकळी, तर पाथर्डी तालुक्यातील बीड सांगवी व चितळवाडी येथे स्थिर पथक नेमले आहे. आचारसंहितेच्या भंगाबाबत कसल्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह सर्वच कार्यकर्त्यांना अवगत करण्यात आले आहे. विनापरवाना फलकांची मांडणी, सोशल मीडियावर राजकीय अफवा अथवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे, विशिष्ट नेते अथवा कार्यकर्त्यांविरुद्ध प्रतिमा मलीन होईल अथवा अफवा पसरवल्या जातील, असा कुठलाही प्रकार खपवून घेणार नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही तालुक्यात संयुक्त तपासणी पथकही कार्यरत राहणार आहे. फिरत्या पथकात महसूल, पोलिस यांच्यासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असेल. वाहन तपासणी नाके अहोरात्र कार्यरत असतील. सहाय्यक अधिकारी म्हणून पाथर्डीचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांसह विविध विभागाचे प्रमुख यंत्रणेत आहेत. लवकरच टोल फ्री क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. निकोप, निर्भय व मुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे. चारही बाजूंनी तपासणी नाके निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मिडसांगवी शिवारात तपासणी नाका सुरू केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर चितळवाडी शिवारातही असा नाका सुरू होणार आहे. तालुक्याच्या चारही बाजूंनी अहोरात्र तपासणी नाके असतील. राहुरी व शेवगाव या दोन तालुक्यांत मतदारसंघ असल्याने तपासणी नाक्यांचे नियोजन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article