महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून मिंधे व भाजपने निवडणूक जिंकली आणि ते पुन्हा सत्तेवर आले. पण गोरगरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे. निवडणूक सरताच मुरबाडच्या 33 वाड्यांवरील मजुरांचे तांडे रोजगाराच्या शोधासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. कुणी हाताला काम देता का काम, असे म्हणण्याची वेळ या मजुरांवर आली असून सरकारी योजना नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुरबाडसारख्या तालुक्यातही आम्हाला पोटाची खळगी भरता येत नसेल तर रोहयोचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल मजुरांनी केला आहे.
नोव्हेंबर महिना सुरू झाला की जून संपेपर्यंत मजूर रोजगाराच्या शोधात वणवण फिरत असतात. मिळेल ते वाहन गाठून मजूर पुणे जिल्ह्यातील बागायती शेतकऱ्यांकडे जातात. ऊसतोड, कांदे लागवड, बटाटे, झेंडूच्या फुलांची शेती, फळभाज्या असे मिळेल ते काम हे मजूर करीत आहेत. मात्र कातकरी समाजाला रोजगाराची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने अनेक जण आपल्या कुटुंबकबिल्यांसह वीटभट्ट्यांवर स्थलांतरित होऊ लागले आहेत. सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हक्काचे काम उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात अनेकांना हे काम मिळालेले नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत.
पेसा अंतर्गत समावेश असला तरी न्याय नाही.
मुरबाड तालुक्यातील ज्या 33 वाड्यांवरील मजूर कामधंद्याच्या शोधासाठी पुण्याकडे निघाले आहेत. त्या वाड्यांचा समावेश सरकारच्या पेसा योजनेत करण्यात आला आहे. येथील सरपंच, उपसरपंच आदिवासी आहेत. तरीदेखील मजुरांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यात भाजप व मिंधे सरकारला अपयश आल्याचे दिसून आले आहे.
येथून मजून निघाले
टोकावडे, माळ, वाळीवरे, भोईर वाडी, भोरांडे, डोंगरवाडी, आवळेवाडी, मोरोशी, मेर्दी, फांगुळगव्हण, निरगुडपाडा, साखरवाडी, चिंचवाडी, केळेवाडी, कुंभाळा, वाघवाडी, कोंबडपाडा, पायरवाडी, धारखिंड, पेंढरी, (वाघवाडी) केव्हारवाडी, बांगरवाडी, झाटघर, दिवाणपाडा, आवळेवाडी, शिसेवाडी, करपटवाडी, तेजवाडी, वाकलवाडी, थिदवी, आल्याची वाडी, मोधळवाडी, बांडेशेत.
■ सरकारी दराप्रमाणे रोजगार हमी योजनेत फक्त 256 रुपये अशी तुटपुंजी रक्कम मिळते. पण हे पैसे अतिशय कमी असल्याने या योजनेकडे मुरबाडमधील मजुरांनी पाठ फिरवली आहे.
■ घाटमाथ्यावर मजुरांना रोज 400 ते 500 रुपये एवढी मजुरी मिळते. म्हणूनच विविध तालुक्यांमधून पुण्याकडे दरवर्षी हजारोंच्या संख्येने मजुरांचे तांडे जातात. त्यानुसार निवडणूक संपताच हे तांडे निघाले आहेत.