न्यायाधीशांकडून घटस्थापना, पहिल्याच दिवशी 50 हजार भक्तांनी घेतले दर्शन:यंदा प्रथमच संबळ वाद्याचा गजर, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांची भेट

2 hours ago 1
सनईची सुरावट, तालासुरात सवाद्य गायलेले स्तोत्र, ब्रह्मवृंदांकडून होणारा वेदमंत्रांचा जयघोष, संबळ वाद्याचा गजर, अशा ओतप्रोत भारलेल्या वातावरणात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोहटे देवस्थानात जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे व अन्य विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना झाली. राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक देवीचा जयजयकार करीत गडावर दाखल झाले. मोहटे गावातून सकाळी देवीचा सुवर्ण मुखवटा व सुवर्ण अलंकाराची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. भाविक, शाळकरी मुले, विविध धार्मिक पथके या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शंभर वादकांचा सहभाग असलेल्या बँड पथकाने भाविकांचे लक्ष वेधले. विश्वस्त मंडळांनी यंदा डीजेमुक्त वातावरणात मिरवणूक काढली. त्याचे सर्वत्र स्वागत झाले. डीजे नसल्याने वातावरण अधिकच धार्मिक बनले. वेदशास्त्रसंपन्न भूषण साखरे, भास्कर देशपांडे, बाळासाहेब शिरसागर व अन्य ब्रह्मवृंदांनी विस्तृतपणे पूजापाठ सादर केला. मंदिराच्या संपूर्ण परिसरात जागा मिळेल, तिथे थांबून भाविकांनी घटस्थापनेच्या धार्मिक विधीत सहभाग घेतला‌. यंदा प्रथमच संबळ वाद्यांचा जोरदार गजर वातावरण बदलणारा ठरला. बुधवारी रात्रीपासून पायी चालत येत सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मंदिराला भेट दिली. यंदा पार्किंग, निवारा सुविधेत वाढ झाल्याने भाविकांची सोय झाली. जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष निरंजन नाईकवाडे, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त मयूर पवार, विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, अक्षय गोसावी, ॲड. विक्रम वाडेकर, अॅड. कल्याण बडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे आदींच्या उपस्थितीत घटस्थापना झाली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी करंजी, तिसगाव, पाथर्डीसह मोहटा यात्रेत बंदोबस्ताचे नियोजन केले. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यात्रा नियोजन करीत आहेत. देवीचा मळवट, हरिपाठ, गडाला प्रदक्षिणा, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम सायंकाळी होऊन सर्वत्र देवीचा जयजयकार, विविध गावाच्या मंडळांच्या वाद्यांचा गजराने परिसर दुमदुमून गेला होता. एकाच वेळी येणाऱ्यांसाठी परिपूर्ण नियोजन नगरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, बीड, पैठण येथून एकाच वेळी येऊ इच्छिणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना पार्किंगची सुविधा मागितली आहे. त्यासाठी देवस्थान समितीचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे. तिसरी माळ शनिवारी असून, त्या दिवसापासून विक्रमी गर्दी होणार आहे. वीज वितरण कंपनीने यंदा वीज पुरवठ्याचे चांगले नियोजन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article