पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करताना डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन Pudhari Photo
Published on
:
21 Nov 2024, 3:40 pm
Updated on
:
21 Nov 2024, 3:40 pm
नवी दिल्ली: कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्व्हानी बर्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान "डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर" प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी, कोविड-१९ महामारीच्या काळात डॉमिनिकाला केलेल्या मदतीसाठी आणि भारत-डॉमिनिका संबंध बळकट करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी दिला गेला. डॉमिनिकाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरिट या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच गयानाचे राष्ट्रपती इर्फान अली, बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया अॅमोर मोटली, ग्रेनेडाचे पंतप्रधान डिकन मिशेल, सेंट लुसियाचे पंतप्रधान फिलिप जे. पियरे आणि अँटिगा आणि बारबुडा यांचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील जनतेला आणि भारत व डॉमिनिकामधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांना समर्पित केला. तसेच, भारत आणि डॉमिनिकामधील द्विपक्षीय संबंध भविष्यात अधिक मजबूत होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. हा पुरस्कार समारंभ गयाना येथील जॉर्जटाउनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या दरम्यान पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन म्हटले आहे की, मला 'डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर' बहाल केल्याबद्दल डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांचे आभार. हा सन्मान माझ्या भारतातील बहिणी आणि बांधवांना समर्पित आहे. दरम्यान, भारताने कोवीड-१९ महामारीमध्ये १५० देशांना मदत केली होती. त्यामध्ये डॉमनिकाचा समावेश होता.