पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून बुधवारी पहाटे झालेल्या एका खुनामुळे पुणेकर हादरले आहेत. कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केल्याची क्रूर घटना बुधवारी पहाटे खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली. ज्योती शिवदास गिते असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. बुधवारी (22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले. शेजाऱ्यांनी चौकशी केली, तेव्हा ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच ज्योती हिने अखेरचा श्वास घेतला तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी ज्योतीचा नवरा शिवदास याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.