पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून बुधवारी पहाटे झालेल्या एका खुनामुळे पुणेकर हादरले आहेत. कौटुंबिक वादातून पतीने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार करून तिची हत्या केली एवढंच नव्हे तर त्यानंतर त्या पतीने या संपूर्ण घटनेचा, रक्ताच्या थारोल्या पडलेल्या पत्नीचा व्हिडीओही तयार केला. आणि त्यानंतर तो स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झाल्याचा हादरवणारा प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील खराडी परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या हत्याकांडाने खळबळ माजली. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली, नंतर त्याचा व्हिडीओ बनवून त्यात या हत्येचं कारणंही कथन केलं.पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कुठे भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड होते तर कुठे गोळीबार होतो. आणि हे कमी की काय म्हणून पतीनेच पत्नीची हत्या करून त्याचा व्हिडीओ बनवल्याचा क्रूर प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खराडीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. पतीने कात्री घेऊन पत्नीच्या गळ्यावर वार केला. तिची हत्या केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या पत्नीचा व्हिडीओ शूट करत पतीने या हत्येचे कारणही सांगितलं. प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून त्याने त्याच्या बायकोलाच संपवलं.आणि हे सगळं केल्यानंतर तो आरोपी पती स्वत:च पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. पुण्यातील चंदननगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत, त्यामध्ये आणखी काय माहिती समोर येत हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालयात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे. ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात बुधवारी पहाटेही असेच वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.
दरम्यान पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत याप्रकरणी माहिती दिली. आरोपीने खून केल्यानंतर video काढला , त्यात त्याने खुनाचे कारण सांगितल्याचे त्यांनी नमूद केलं. 2023 मध्ये पुणे शहरात 11 हजार 974 गुन्हे नोंद झाले होते. तर 2024 या वर्षामध्ये 12 हजार 954 गुन्हे नोंद झाले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 1 हजार गुन्हे वाढल्याची माहिती त्यांनी दिली.
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी सकारात्मक पावलं उचलंत गुन्हेगारीला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला असता तर गुन्हेगारांना पोलिसांचा जरा तरी धाक उरला असता आणि पत्नीचा राजेरोसपणे खून करून व्हिडीओ काढून असा आरोपी मान वर करून, मोठं काम केल्याच्या थाटात पोलिसांसमोर आला नसता,असं संतप्त सुषमा अंधारे म्हणाल्या.काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनीही या क्रूर घटनेवरून संताप व्यक्त केलाय. चुकीच्या लोकांना पाठिशी घातल्यामुळे समाजात पोलिसांची दहशतच उरली नाहीये, लोकं सर्रास अशा पद्धतीने वागत आहेत. पोलिस किंवा कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही, अशी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची धारणा झाल्याचे त्यांनी नमूद केलं.पोलिसांची लोकांना भीतीच वाटत नाही, यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर गंभीर पावलं उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.