पार्ट टाइम नोकरीच्या आमिषाने तरुणाची 25 लाखांची फसवणूकPudhari File Photo
Published on
:
03 Feb 2025, 8:50 am
Updated on
:
03 Feb 2025, 8:50 am
पुणे: पार्ट टाइम नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची 24 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येवलेवाडीत राहणार्या 34 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत पार्ट टाइम नोकरी असल्याचे सांगून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला फिर्यादी तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. पैसे मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी पैसे जमा करण्यास सांगितले.
या कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाकडून वेळोवेळी 24 लाख 47 हजार घेतले. त्यानंतर तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख करत आहेत.