Published on
:
03 Feb 2025, 11:57 am
Updated on
:
03 Feb 2025, 11:57 am
भंडारा:- भंडारा आयुध निर्माणी येथील २४ जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात ८ कर्मचारी ठार तर ५ गंभीर जखमी झाले. ही घटना कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांसह रोजंदारीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी धडकी भरणारी ठरली. यामुळे येथे रोजंदारीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचार्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे का? असा प्रश्न पडला आहे.
भंडारा आयुध निर्माणीसह देशातील केंद्रीय रक्षा विभागाअंतर्गत येत असलेल्या आयुध निर्माणीचे खाजगीकरण करून १२ निर्माणी या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडकडे दिले गेले आहे. या बारा मध्ये आयुध निर्माणी, भंडाराचा समावेश आहे. खासगीकारणातून कायम नोकरीच्या मागे न लागता बहुतेक बेरोजगार येथील ठेकेदार पद्धतीतील कंत्राटी रोजंदारीवर काम करून आपला व कुटुंबीयांचे संगोपन करीत आहेत.
या निर्माणीत अकुशल कंत्राटी रोजंदारीवर काम करणार्या कर्मचार्यांची संख्या ५०० च्या जवळपास आहे. कार्यालयीन कामाव्यतिरिक्त अकुशल कामगारांना सुरक्षेच्या किटविना कुशल कामातील डेंजर बिल्डिंग येथील मशिनरीची साफसफाई, दारू गोळा लोडींग-अनलोडींग व अन्य धोकादायक कामे अल्पशा रोजीवर कंत्राटदाराकडून करवून घेतले जात आहे. त्यातही हे कामे महिन्यातील १८ ते २२ दिवसच कंत्राटदाराकडून दिले जाते. शासकीय मजुरीचा दर रेकॉर्डवर वेगळाच व हाती वेगळाच दिला जातो. येथील रोजंदारीवर कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचार्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण कंत्राटदाराकडून केले जात असल्याची ओरड नेहमी या कामगारांकडून केली जात आहे. मात्र त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला तर कामावरून काढले जाते, ही भीती कायम असते.