गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) Pudhari
Published on
:
03 Feb 2025, 11:56 am
Updated on
:
03 Feb 2025, 11:56 am
पिंपरी : शहरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने त्रस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. शून्य ते 19 वयोगटामध्ये आत्तापर्यंत 5 रुग्ण आढळले आहेत. तर, 20 ते 39 वयोगटातील चौघांना या आजाराची लागण झाली आहे. शहरामध्ये हळूहळू जीबीएस हा आजार शिरकाव करु लागला आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण 18 रुग्णांमध्ये शून्य ते 9 वयोगटात 4 रुग्ण आढळले आहेत. तर, 10 ते 19 वयोगटात एक रुग्ण आढळून आला आहे. 20 ते 29 या वयोगटातील तरुणांमध्ये 2 तर, 30 ते 39 या वयोगटामध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत.
ज्येष्ठांमध्ये नगण्य प्रमाण
60 वयोगटापुढील ज्येष्ठांमध्ये मात्र हे प्रमाण तुलनेत नगण्य आहे. 60 ते 69 या वयोगटात 2 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 70 ते 79 या वयोगटामध्ये मात्र एकच रुग्ण आढळला आहे. ज्येष्ठांमध्ये या आजाराचा सध्यातरी मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला नाही.
मध्यम वयोगटातही रुग्ण
मध्यम वयोगटातही जीबीएसचे रुग्ण आढळून आले आहेत. 40 ते 49 या वयोगटामध्ये 2 तर, 50 ते 59 वयोगटामध्ये 4 रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे जीबीएस या आजाराची सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये लागण झाली असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
हेल्पलाइन कार्यान्वित
महापालिका प्रशासनाने सारथी प्रकल्पाच्या मदतीने रविवारी (दि. 2) हेल्पलाइन कार्यान्वित केली. हेल्पलाइनचा क्रमांक 7758933017 हा आहे. त्यासाठी 7 वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक केलेली आहे. प्रत्येक रुग्णालय झोननिहाय एक वैद्यकीय अधिकारी असे एकूण 8 वैद्यकीय अधिकारी यांची जीबीएस नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
जनतेने घाबरुन न जाता जीबीएस आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात जावे. तसेच, या आजाराच्या प्रतिबंधासाठी स्वच्छ आणि ताजे अन्न घ्यावे. पिण्याचे पाणी दूषित राहू नये, यासाठी उकळुन प्यावे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका