Published on
:
22 Nov 2024, 7:11 am
Updated on
:
22 Nov 2024, 7:11 am
पालघर : पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान झाले. सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५३ उमेदवार निवडणुकीसाठी उभे असले तरी खारी लढत १५ उमेदवारांमध्ये आहे. मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत सर्वांनीच आपले सर्वस्व पणाला लावून आपल्याकडे मतदान कसे खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विधानसभेतील विविध विभागांचा आढावा घेत आपण निवडून येऊ अशी, आशा प्रमुख उमेदवारांनी व्यक्त केली आहे. तर मतदान कुठे कसे किती इाले याचे तर्कवितर्क लावण्यात उमेदवारांची धाकबूक वाढली आहे.
पालघर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणुकी च्या रिंगणात प्रमुख लढत असलेल्या उमेदवारांकडून प्रचार, नागरी समस्या, विकास, जिल्ह्यातील प्रकल्पातून होणारा भकास, पक्ष फुटी, बंडखोरी, पक्षपातीपणा, सामान्य नागरिकांतून दिलेला उमेदवार, शेतकरी, ओबीसी, मतदारसंघांमधील विकास कामांचे आश्वासन, मच्छीमार समाजासह विविध समाजाच्या समस्या, उमेदवारांचे एकमेकांवरील दावेप्रति दावे व आरोप प्रत्यारोप, धर्माधता, द्वेष, सामाजिक कामे आदी मुद्दे पुढे आणून मतदानाच्या ४८ तास अगोदर पर्यंत जिल्ह्यातील सहा मतदारसंघात निवडणुकीचे रण चांगलेच तापले होते, मतदानासाठी ग्रामीण भागात लक्ष्मी दर्शन होण्यासाठी महापूर आला होता.
महायुतीमार्फत व महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी, जिजाऊ मार्फत दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या. या सभांना मोठी गर्दी जमली. मात्र मतदानाच्या दिवशी मतांची गर्दी कोणत्या उमेदवाराकडे असेल हे २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. डहाणू विधानसभा मतदार संघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे वलय आहे. येथे माकपाचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांचा सामना महायुतीच्या भाजपचे विनोद मेढा यांच्याशी थेट होता. मतदार संघामध्ये केलेली कामे व जनाधार लक्षात घेता आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास निकोले यांना असला तरी या मतदारसंघांमध्ये भाजप मार्फत करण्यात आलेला प्रचार व प्रसार तसेच महायुती सरकारच्या योजनांचा फायदा मेढा यांना होऊन ते विजय होतील अशी अपेक्षा भाजपला आहे.
जनतेने आम्हाला कौल दिला आहे. अशी दोघांचीही भावना असली तरी मतपेटीत दोघांपैकी कोणाला जास्त मते मिळाली हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये बंदा प्रकाश निकम यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीचे रण चांगलेच तापले होते. या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार वशरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार सुनील भुसारा विरुद्ध महायुतीमार्फत भाजपचे हरिचंद्र भोये व अपक्ष उमेदवार प्रकाश निकम यांच्यात तणावपूर्ण लढत पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काळात प्रकाश निकम यांचा मतदारसंघामध्ये चांगलाच जोर दिसून आला. त्या पाठोपाठ सुनील भुसारा हे प्रकाश निकम व भोये यांना काटे की टक्कर देत असल्याचे चित्र होते.
मतदार संघातील विकास नागरिकांच्या समस्या सोडवण्यात आपण यशस्वी ठरल्याने आपला विजय होईल अशी ठाम खात्री सुनील भुसारा यांना आहे. तर या मतदारसंघात मतदारांनी भाजपल कौल दिल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे हरिचंद्र भोये यांचे मत आहे. तर तिसरीकडे या दोघांवर ही मात देत आपण निवडून येऊ असा विश्वास प्रकाश निकम यांनी व्यक्त केला आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित व ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा यांच्यात संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली. किनारपट्टी, ग्रामीण भागातील मतदारांचा दुबळा यांच्याकडे असलेला ओघ व मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, म्हणून मतदारांनी दुबळा यांना भरभरून मते दिली असून आपला विजय जवळपास निशित असल्याचे त्यांनी मानले आहे. तर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसह मतदारांशी नाळ जोडलेले म्हणून मतदारांनी आपल्याला शंभर टक्के कौल दिला असून आपण या मतदारसंघात पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेबर जाणार असा ठाम विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे. दोघांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असला तरी दोन्ही पक्षातील राजकीय वर्तुळात एकमेकांविषयी चिंता वर्तवली जात आहे.
बोईसर मतदारसंघात तिघांमध्ये जंगी सामना
बोईसर विधानसभा मतदार संघामध्ये ठाकरे गटाचे डॉ. विश्वास वळवी, बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार व उमेदवार राजेश पाटील तर शिवसेनेचे विलास तरे या तिघांमध्ये जंगी सामना व लवत होती. तिघांनीही पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. या मतदारसंघात तिन्ही उमेदवारांना विजयाची ठोस आशा आहे. विश्वास वळवी यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना मतदारांनी पसंती दिल्याचे त्यांचे म्हणणे असून विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासात्मक कामासाठी मतदारांनी मला मतदान केल्याचा विश्वास व्यक्त केला. तर महायुती सरकारने केलेल्या विकासासाठी मतदार वगनि शिवसेनेला मतदान केल्याने विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघातून फडकेल असा विश्वास विलास तरे यांना आहे.
वसई विधानसभा मतदारसंघात संघर्षमय लढत
वसई विधानसभा मतदारसंघात प्रथमच हितेंद्र ठाकूर यांना भाजपच्या स्नेहा दुबे पंडित व काँग्रेसच्या विजय पाटील यांचे आव्हान होते. गेल्या सहा टर्ममध्ये या मतदारसंघातून आमदार होतो व आता समोर असलेली दोन्ही आव्हाने पेलत झालेल्या संघर्षमय लढतीतही आपला विजय निशित असल्याचे व सातव्या वेळा आपण आमदार होण्यास सज्ज आहोत असे हितेंद्र ठाकूर व बहुजन विकास आघाडीचा विश्वास आहे. तर भाजपने केलेला प्रचार प्रसार व महायुती सरकारने केलेली कामे या बळावर मतदारांनी आपल्याला कौल दिल्याचे स्नेहा दुवे पंडित यांच्यासह भाजपला विश्वास आहे. तिसरीकडे वसई मतदारसंघात काँग्रेसने केलेल्या प्रचाराच्या जोरावर मतदार वर्गांनी मला कौल दिल्याचे विजय पाटील यांनी सांगितले आहे.
बहुजन विकास आघाडीला विजयाची आशा
नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असला तरी लोकसभेमध्ये मिळालेल्या मतांची आकडेवारी समोर ठेवत येथे भाजपचे राजन नाईक विजयी होतील अशी अपेक्षा भाजपाला आहे. तर येथे मतदारांनी भाजपला नकारले आहे. म्हणून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना मतदारांनी कौल दिल्याचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्वतः ठाकूर यांना विश्वास असल्याने मीच येथे दसऱ्यांदा आमदार होणार असा कयास त्यांनी बांधला आहे.
मतमोजणीच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रमुख लढत असलेल्या उमेदवारांनी आमदार म्हणून निवडून येण्याचा विश्वास एकंदर परिस्थिती लक्षात घेता व्यक्त केला आहे. मात्र मतदारांनी आपापल्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पसंती दिली हे मतमोजणीच्या दिवशी सुस्पष्ट होणार आहे. तोवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या धाकधुकी कायम असून आतापर्यंत केलेल्या प्रचार प्रसाराच्या जोरावर कुठे जास्त तर कुठे कमी मते मिळाली याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.