Published on
:
17 Nov 2024, 7:37 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:37 am
पुणे विमानतळावरील प्रवाशांसोबतच आता पुणे विमानतळावरून होणारी मालवाहतूक यंदा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. येथून होणाऱ्या देशांतर्गत मालवाहतुकीमध्ये यंदा ६.३२ टक्क्यांनी वाढ झाली असून, गेली सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर २०२४-२५) १९ हजार ६६२.५ मेट्रिक टन देशांतर्गत मालवाहतूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावरून पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या वाढीसोबतच पुणेकरांचा व्यापारदेखील वाढत असल्याचे समोर येत आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०२४-२५ या सहा महिन्यांशी तुलना केली असता, यंदा एक हजार १६७ मेट्रिक टन मालवाहतूक पुणे विमानतळावरून अधिक झाल्याचे समोर आले आहे. ही नोंद भारतीय विमानतळ प्रशासनाने केली आहे. पुणे विमानतळावरून होणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या कामकाजाची माहिती नुकतीच दै. 'पुढारी'ने घेतली. त्यात देशांतर्गत मालवाहतुकीत ६.३२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले. ही मालवाहतूक गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे.
गेल्या वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीशी यंदाच्या देशांतर्गत मालवाहतुकीत यंदा ६.३२ टक्क्यांनी वाढ परदेशात ६७.५ मेट्रिक टन मालवाहतूक पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सध्या जोरात सुरू आहे. मागील वर्षी येथून फक्त देशांतर्गत मालवाहतूक सुरू होती. तर आंतरराष्ट्रीय मालवाहतूक बंद होती. यंदा पुन्हा आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर २०२४-२५) येथून ६७.५ मेट्रिक टन मालवाहतूक परदेशात करण्यात आली आहे.
नवीन कार्गो टर्मिनलमुळे दिलासा
भारतीय हवाई दलाने पुणे विमानतळ प्रशासनाला नवीन कार्गो टर्मिनल उभारण्यासाठी मोठी मदत केली आहे. येथीलच १.७६ एकर जागा विमानतळ प्रशासनाला कार्गो टर्मिनलसाठी देण्यात आली आहे. त्याच जागेवर विमानतळ प्रशासनाने आता नवीन कार्गो टर्मिनल उभारले आहे. जुन्या कार्गो टर्मिनलचे स्थलांतर नव्याने उभारण्यात आलेल्या कार्गो टर्मिनलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. नव्या कार्गो टर्मिनलमुळे मालवाहतूक वेगाने होत असून, यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
सुरक्षा तपासणीनंतर मालाची वाहतूक पालेभाज्या... फळभाज्या... विविध प्रकारची औषधे... विविध छोट्या वस्तू... यांसारख्या अनेक वस्तूंची मालवाहतूक पुणे विमानतळावरून केली जाते. ही सेवा हाताळण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून मालवाहतुकीच्या प्रत्येक बॉक्सेसची या विभागाकडून कसून तपासणी केली जाते. तपासणी केल्यानंतरच मालवाहतुकीचे बॉक्सेस देशातील विविध राज्यांमध्ये आणि परदेशांमध्ये पाठवले जातात.