पुणे शहरात 7 नव्या पोलिस स्टेशनसह 816 पदांना मंजुरी:पोलिस आयुक्तांची माहिती; वाढत्या गुन्हेगारीला लगाम बसण्याची शक्यता

2 hours ago 1
पुणे शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नवीन पोलिस स्टेशन तयार करण्यात यावेत, तसेच 1700 पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला होता. राज्य सरकारने त्यानुसार सात नवीन पोलिस स्टेशन मंजूर केले असून 816 अधिकारी आणि कर्मचारी पदांना मंजुरी दिल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वर्गीकरण करून आंबेगाव पोलिस स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. याकरीता सात कोटी नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पोलिस स्टेशनला 98 पदांची मंजुरी देण्यात आली आहे. हवेली ,सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतील काही भाग विभक्त करून नांदेड सिटी पोलिस स्टेशन निर्माण करण्यात आले आहे. त्यासाठी 118 पदे त्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. पोलिस स्टेशनच्या निर्मितीसाठी 8.60 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. चतूर्शृंगी पोलिस स्टेशन मधील भौगोलिक भागाचे विभक्तीकरण करून बाणेर पोलिस स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी 118 पदांना मंजुरी देण्यात आली असून 8.60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय चंदननगर पोलिस स्टेशनचे दोन भाग करून खराडी पोलिस स्टेशन निर्माण करण्यात आले आहे. यासाठी 103 पदांना मंजुरी देण्यात आली असून साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हडपसर, कोंढवा आणि वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील काही भाग वेगळे करून काळेपडळ पोलिस स्टेशनची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याकरीता 140 पदांना मंजुरी देण्यात आली असून 10.24 कोटी रुपये यासाठी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हडपसर, लोणी काळभोर पोलिस स्टेशन मधील काही हद्द एकत्रित करून फुरसुंगी पोलिस स्टेशन नव्याने निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी 112 पदांना मंजुरी मिळाली असून 8.81 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. लोणीकंद पोलिस स्टेशन मधून वाघोली पोलिस स्टेशन नव्याने निर्माण करण्यात आले आहे. यासाठी 118 पदांना मंजुरी देण्यात आली असून 8.75 कोटी रुपये खर्च मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनसाठी नवीन इमारत बांधण्यास मंजुरी मिळाली असून त्याकरीता 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, सदर पोलिस स्टेशन एकाच वेळी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन सदर कार्यक्रम आचारसंहितेपूर्वी करण्यात येईल. संबंधित सात पोलीस स्टेशन करीता नव्याने इमारत शोधण्यात येत असून सध्याच्या मनुष्यबळाचा वापर या पोलिस स्टेशनसाठी करण्यात येणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article