पोलिस दीदीही लाडकी:‘गर्भवती’ महिला पोलिसांना आता पहिल्या महिन्यापासूनच नेसता येणार साडी; आधी चार महिन्यांनंतर होती सवलत

2 hours ago 2
लाडक्या बहिणींवरची सरकारची माया दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येनकेन प्रकारे महिला मतदारांना खूश करण्याच्या सपाट्यात आता महिला पोलिसांनाही सवलतीची ओवाळणी मिळाली आहे. गर्भवती पोलिसांना शर्ट-पॅन्टच्या गणवेशाऐवजी साडी नेसण्याची चार महिन्यांनंतर मिळणारी सवलत आता पहिल्या महिन्यापासूनच देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. अर्थात, त्यासाठी या महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून १६ आठवड्यांचा काळ महिलांसाठी महत्वाचा आणि कसोटीचा असतो. या नाजूक काळात त्यांनी पोटावर पट्टा धारण केला तर गर्भावर अनावश्यक ताण येऊन गर्भपात होण्याची शक्यता असते, असा अभिप्राय पोलिस शल्यचिकित्सक आणि पोलिस रुग्णालयांसह सर्व पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गृहविभागाला पाठविण्यात आला होता. त्याचा विचार करून आता १६ आठवड्यानंतर दिली जाणारी साडी नेसण्याची सवलत आता पहिल्या महिन्यापासूनच दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्याकडे गर्भधारणा झाली असल्याबाबत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलांनी स्वागत करून सरकारचे आभार मानले आहेत. गणवेशातील पट्ट्यामुळे पोटावर येतो ताण राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाच्या विनंतीनंतर बुधवारी गृह विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. गरोदर पोलिस महिलांना कर्तव्य बजावताना १६ आठवड्यानंतर साडी परिधान करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, सुरुवातीचे ४ महिने गर्भवतींच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. या काळात पोलिस गणवेशातील पट्टयामुळे पोटावर येणाऱ्या ताणामुळे गर्भाला धोका संभवतो. त्यामुळे गरोदरपणाच्या पहिल्या दिवसापासून साडी परिधान करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी राज्य पोलिस दलाने महासंचालक कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त, अधीक्षक, पोलिस रुग्णालयातील शल्यचिकित्सकांच्या चर्चेनंतर गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्हावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article